व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ८

अब्राहाम आणि साराने यहोवाचं ऐकलं

अब्राहाम आणि साराने यहोवाचं ऐकलं

बाबेलच्या जवळच ऊर नावाचं शहर होतं. तिथले लोक यहोवाला सोडून दुसऱ्‍या देवी-देवतांची उपासना करायचे. पण त्या शहरात एक असाही पुरुष होता, जो फक्‍त यहोवाचीच उपासना करायचा. त्याचं नाव होतं अब्राहाम.

यहोवाने अब्राहामला सांगितलं: ‘तू आपलं घर आणि नातेवाइकांना सोडून, जे ठिकाण मी तुला दाखवेन तिथे जा.’ मग देवाने त्याला वचन दिलं: ‘तुझ्यापासून एक मोठं राष्ट्र बनेल. तू विश्‍वासू राहिल्यामुळे मी पूर्ण पृथ्वीवर अनेक लोकांसाठी चांगल्या गोष्टी करेन.’

अब्राहामला हे माहीत नव्हतं, की यहोवा त्याला कुठे पाठवणार आहे. पण, त्याने यहोवावर भरवसा ठेवला. मग अब्राहाम, त्याची पत्नी सारा, त्याचे वडील तेरह आणि त्याचा भाचा लोट यांनी सामान बांधलं आणि यहोवाने सांगितल्याप्रमाणे ते लांबच्या प्रवासाला निघाले.

शेवटी अब्राहाम आणि त्याचं कुटुंब त्या ठिकाणी पोचलं जे यहोवाला त्यांना दाखवायचं होतं. त्या ठिकाणाचं नाव होतं कनान. आता अब्राहाम ७५ वर्षांचा झाला होता. तिथे पोचल्यावर देव अब्राहामसोबत बोलला. त्याने त्याला असं वचन दिलं: ‘ही सगळी जागा जी तू पाहत आहेस, ती मी तुझ्या मुलांना देईन.’ पण, अब्राहाम आणि सारा यांना एकही मूल नव्हतं आणि आता तर ते म्हातारेही झाले होते. मग यहोवा जे बोलला ते कसं काय पूर्ण होणार होतं?

“विश्‍वासानेच . . . [अब्राहामने] आज्ञा मानली आणि देवाकडून वारशाने मिळणार असलेल्या ठिकाणी तो जायला निघाला; आपण कुठे जात आहोत हे माहीत नसतानाही तो गेला.” —इब्री लोकांना ११:८