व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ९

शेवटी त्यांना एक मुलगा झाला!

शेवटी त्यांना एक मुलगा झाला!

अब्राहाम आणि साराचं लग्न होऊन खूप वर्षं झाली होती. आधी ते ऊर शहरात अगदी आरामात राहत होते. पण, त्यांनी ऊरमधलं आपलं घर सोडलं होतं. आता ते तंबूमध्ये राहत होते. असं असलं तरी, साराने कधीच याबद्दल तक्रार केली नाही. कारण यहोवावर तिला पूर्ण भरवसा होता.

साराची खूप इच्छा होती, की तिला एक मूल असावं. म्हणून ती अब्राहामला म्हणाली: ‘समजा माझी दासी हागार हिला एक मूल झालं, तर ते माझंच मूल आहे असं मला वाटेल.’ काही काळाने हागारला एक मुलगा झाला. त्याचं नाव होतं, इश्‍माएल.

खूप वर्षांनंतर तीन पाहुणे अब्राहाम आणि साराला भेटायला आले. त्या वेळी अब्राहाम ९९ वर्षांचा तर सारा ८९ वर्षांची होती. अब्राहामने त्यांना एका झाडाखाली आराम करायला सांगितलं. मग त्याने त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था केली. तुला माहीत आहे का ते पाहुणे कोण होते? ते देवदूत होते! ते अब्राहामला म्हणाले: ‘पुढच्या वर्षी या वेळी तुला आणि तुझ्या पत्नीला एक मुलगा होईल.’ तंबूच्या आत सारा हे सगळं ऐकत होती. ती स्वतःवर हसली आणि तिने विचार केला: ‘आता तर मी किती म्हातारी झाली आहे. या वयात मला खरंच मूल होईल का?’

यहोवाच्या देवदूताने वचन दिलं. त्याच्या दुसऱ्‍याच वर्षी साराला एक मुलगा झाला. अब्राहामने त्याचं नाव इसहाक ठेवलं. इसहाकचा अर्थ हसणं असा होतो.

जेव्हा इसहाक जवळपास पाच वर्षांचा होता, तेव्हा साराने पाहिलं की इश्‍माएल नेहमी इसहाकला चिडवायचा. तिला आपल्या मुलाचं रक्षण करायचं होतं. म्हणून तिने अब्राहामला सांगितलं, की त्याने हागार आणि इश्‍माएलला पाठवून द्यावं. सुरुवातीला अब्राहाम असं करण्यासाठी तयार नव्हता. पण नंतर यहोवाने अब्राहामला सांगितलं: ‘तू साराचं ऐक. कारण, तुला मी जे वचन दिलं आहे ते इसहाकद्वारेच पूर्ण होईल. इश्‍माएलची काळजी करू नकोस. त्याला मी सांभाळेन.’

“विश्‍वासानेच, सारालासुद्धा . . . गर्भधारणेची शक्‍ती मिळाली, कारण वचन देणारा विश्‍वसनीय असल्याचे तिने मानले.” —इब्री लोकांना ११:११