व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ १०

लोटच्या बायकोला आठवणीत ठेवा

लोटच्या बायकोला आठवणीत ठेवा

लोट आपल्या काकांसोबत म्हणजे अब्राहामसोबत कनानमध्ये राहत होता. पण, नंतर अब्राहाम आणि लोट यांच्याजवळ असलेल्या प्राण्यांची संख्या वाढली. त्यामुळे त्यांना जागा कमी पडू लागली. म्हणून अब्राहामने लोटला म्हटलं: ‘आपण दोघं आता सोबत एकाच ठिकाणी राहू शकत नाही. म्हणून तू बघ तुला कोणती जागा आवडते. आधी तू जागा निवड मग मी दुसरीकडे जाईन.’ यावरून आपल्याला कळतं, की अब्राहाम स्वार्थी नव्हता. हो ना?

लोटने सदोम शहराच्या जवळ असलेली एक सुंदर जागा पाहिली. तिथे भरपूर पाणी आणि हिरवंगार गवत होतं. म्हणून त्याने ती जागा निवडली आणि आपल्या कुटुंबासोबत तो तिथे राहायला गेला.

सदोमच्या जवळ गमोरा नावाचं एक शहर होतं. या दोन्ही शहरांमधले लोक खूप वाईट होते. ते लोक इतके वाईट होते, की यहोवाने त्या शहरांचा नाश करायचं ठरवलं. पण, देवाला लोट आणि त्याच्या कुटुंबाला वाचवायचं होतं. त्यामुळे, त्याने दोन देवदूतांना त्याच्या घरी पाठवलं. ते त्याला म्हणाले: ‘चल पटकन! या शहरातून बाहेर निघ! यहोवा या शहराचा नाश करणार आहे.’

पण लोट लगेच निघाला नाही. तो उशीर करत होता. त्यामुळे, ते देवदूत लोट, त्याची पत्नी आणि त्याच्या दोन मुलींचा हात धरून त्यांना घाई-घाईने शहराबाहेर नेऊ लागले. ते त्यांना म्हणत होते: ‘पळा पटकन! आपला जीव वाचवा. मागे वळून पाहू नका. तुम्ही मागे वळून पाहिलं तर मरून जाल.’

जेव्हा ते सोअर नावाच्या शहरात पोचले, तेव्हा देवाने सदोम आणि गमोरा शहरांवर आगीचा आणि गंधकाचा पाऊस पाडला. या दोन्ही शहरांचा पूर्णपणे नाश झाला. पण लोटच्या बायकोने यहोवाचं ऐकलं नाही आणि मागे वळून पाहिलं, तेव्हा ती मिठाचा खांब बनली. पण, लोट आणि त्याच्या मुलींनी देवाचं ऐकल्यामुळे त्यांचा जीव वाचला. जेव्हा लोटच्या बायकोने देवाचं ऐकलं नाही, तेव्हा त्या तिघांना खूप वाईट वाटलं असेल. नाही का? यावरून आपण हेच शिकतो, की यहोवाच्या मार्गदर्शनांचं पालन करणं खरंच खूप महत्त्वाचं आहे.

“लोटच्या बायकोला आठवणीत ठेवा.”—लूक १७:३२