व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ११

विश्‍वासाची परीक्षा

विश्‍वासाची परीक्षा

अब्राहामने आपल्या मुलाला म्हणजे इसहाकला यहोवावर प्रेम करायला आणि यहोवाच्या सर्व वचनांवर विश्‍वास ठेवायला शिकवलं. पण जेव्हा इसहाक जवळपास २५ वर्षांचा झाला, तेव्हा यहोवाने अब्राहामला असं काहीतरी करायला सांगितलं, जे त्याला खूप कठीण जाणार होतं. यहोवाने त्याला नेमकं काय करायला सांगितलं?

देव अब्राहामला म्हणाला: ‘तुझ्या एकुलत्या-एका मुलाला घेऊन मोरिया इथल्या डोंगरावर जा आणि त्याला बलिदान म्हणून अर्पण कर.’ यहोवा आपल्याला असं का करायला सांगत आहे, हे अब्राहामला कळलंच नाही. तरीसुद्धा यहोवाने जे सांगितलं ते त्याने ऐकलं.

दुसऱ्‍या दिवशी अब्राहाम सकाळी लवकर उठून इसहाक आणि दोन सेवकांना घेऊन मोरियाकडे निघाला. तीन दिवस प्रवास केल्यानंतर त्यांना डोंगर दिसू लागले. अब्राहामने आपल्या सेवकांना सांगितलं, की तो आणि इसहाक बलिदान देऊन येतील तोपर्यंत त्यांनी तिथेच थांबावं. अब्राहामने इसहाकला लाकडं उचलून घ्यायला सांगितली. तसंच, अब्राहामने आपल्यासोबत सुरा घेतला. इसहाकने आपल्या वडिलांना विचारलं: ‘आपण बलिदानासाठी प्राणी तर घेतलाच नाही?’ अब्राहामने उत्तर दिलं: ‘बाळा, त्याची काळजी करू नकोस. यहोवा पुरवेल.’

शेवटी डोंगरावर पोचल्यावर त्यांनी एक वेदी बांधली. त्यानंतर अब्राहामने इसहाकचे हात-पाय बांधून त्याला वेदीवर ठेवलं.

अब्राहामने सुरा उचलला. त्याच वेळी यहोवाच्या देवदूताने स्वर्गातून हाक मारली: ‘अब्राहाम! थांब. मुलाला मारू नकोस! तुझा देवावर विश्‍वास आहे, हे मला आता समजलं आहे. कारण तू आपल्या मुलाचं बलिदान द्यायला तयार झालास.’ त्यानंतर अब्राहामला झुडपात एक मेंढा दिसला. त्याची शिंगं त्या झुडपात अडकली होती. त्याने लगेच इसहाकचे हात-पाय सोडले. मग इसहाकच्या जागी त्याने मेंढ्याला बलिदान म्हणून अर्पण केलं.

त्या दिवसापासून यहोवाने अब्राहामला आपला मित्र म्हटलं. का ते तुला माहीत आहे? कारण यहोवाने अब्राहामला जे काही सांगितलं ते सर्व त्याने केलं. यहोवा एखादी गोष्ट का करायला सांगत आहे, हे समजत नसतानाही त्याने ती गोष्ट केली.

अब्राहामला दिलेल्या वचनाची यहोवाने परत एकदा त्याला आठवण करून दिली. यहोवा म्हणाला: ‘मी तुला आशीर्वाद देईन. तुझी मुलं, तुझी संतती खूप वाढेल.’ याचा अर्थ, यहोवा सर्व चांगल्या लोकांना अब्राहामच्या वंशाद्वारे आशीर्वाद देणार होता.

“कारण देवाने जगावर इतकं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्वकाळाचं जीवन मिळावं.”—योहान ३:१६