व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ १२

याकोबला वारसा मिळाला

याकोबला वारसा मिळाला

इसहाक ४० वर्षांचा असताना त्याचं रिबकासोबत लग्न झालं. त्याचं तिच्यावर खूप प्रेम होतं. पुढे त्यांना दोन जुळी मुलं झाली.

मोठ्या मुलाचं नाव होतं एसाव आणि लहान मुलाचं याकोब. एसावला जास्तकरून बाहेर राहायला आवडायचं. तो शिकार करण्यात खूप हुशार होता. पण याकोब त्याच्या अगदी उलट होता. त्याला घरी राहायला आवडायचं.

त्या काळात वडिलांच्या मृत्यूनंतर, मोठ्या मुलाला संपत्तीचा जास्त वाटा मिळायचा. याला वारसा असं म्हणतात. इसहाकच्या कुटुंबात वारशामध्ये आणखी एक गोष्ट सामील होती. ती म्हणजे यहोवाने अब्राहामला दिलेली वचनं. एसावला या वचनांची जरासुद्धा पर्वा नव्हती. पण ती किती महत्त्वाची आहेत, हे याकोबला माहीत होतं.

एक दिवस एसाव शिकार करून घरी परत आला. पूर्ण दिवस शिकार केल्यामुळे तो खूप थकला होता. त्या वेळी याकोब खाण्यासाठी जे बनवत होता त्याचा सुगंध एसावला आला. तो म्हणाला: ‘मला भूक लागली आहे! मला ती थोडी लाल डाळ दे.’ तेव्हा याकोब म्हणाला: ‘देतो, पण आधी मला वचन दे, की तू मला तुझा वारसाहक्क देशील.’ त्यावर एसाव म्हणाला: ‘मला काय करायचं त्या वारशाचं? घे तुला तो वारसा. पण मला ती डाळ दे पटकन खायला.’ एसावने जे केलं, त्याबद्दल तुला काय वाटतं, ते बरोबर होतं का? नाही. कारण, एसावने फक्‍त वाटीभर डाळीसाठी खूप मौल्यवान गोष्ट देऊन टाकली.

आता इसहाक खूप म्हातारा झाला होता. आपल्या मोठ्या मुलाला आशीर्वाद देण्याची वेळ आली होती. पण रिबकाने आपल्या धाकट्या मुलाला म्हणजे याकोबला तो आशीर्वाद मिळवायला मदत केली. पण जेव्हा एसावला याविषयी कळलं, तेव्हा त्याला खूप राग आला. त्याने आपल्या सख्ख्या भावाचा जीव घेण्याचं ठरवलं. इसहाक आणि रिबका यांना याकोबला वाचवायचं होतं. म्हणून ते त्याला म्हणाले: ‘एसावचा राग शांत होईपर्यंत, तू लाबान मामाकडे जाऊन राहा.’ याकोबने आपल्या आईवडिलांचं ऐकलं आणि आपला जीव वाचवण्यासाठी तिथून निघून गेला.

“खरोखर, एखाद्या माणसाने संपूर्ण जग मिळवलं, पण आपला जीव गमावला तर त्याचा काय उपयोग? एखादा माणूस आपल्या जिवाच्या मोबदल्यात खरंच काय देऊ शकेल?”—मार्क ८:३६, ३७