व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ १३

याकोब आणि एसावचं भांडण मिटलं

याकोब आणि एसावचं भांडण मिटलं

अब्राहाम आणि इसहाकप्रमाणे, यहोवाने याकोबलाही वचन दिलं की तो त्याचं रक्षण करेल. याकोब हारान नावाच्या ठिकाणी राहू लागला. त्याचं लग्न झालं आणि त्याला बरीच मुलं झाली. इतकंच नाही, तर तो खूप श्रीमंतही झाला.

पण काही काळाने यहोवाने याकोबला म्हटलं: ‘तू आपल्या देशात परत जा.’ म्हणून याकोब आणि त्याचं कुटुंब परत जाण्यासाठी लांबच्या प्रवासाला निघाले. पण रस्त्यात याकोबचे काही सेवक त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले: ‘तुझा भाऊ एसाव ४०० पुरुषांसोबत येत आहे!’ याकोब खूप घाबरला. त्याला वाटलं की एसाव, आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला मारून टाकेल. त्यामुळे त्याने यहोवाला प्रार्थना केली: ‘कृपा करून, मला माझ्या भावापासून वाचव.’ दुसऱ्‍याच दिवशी याकोबने एसावला भेट पाठवली. त्याने त्याच्यासाठी खूप सारी मेंढरं, गाढवं, बकऱ्‍या, गायी आणि उंट पाठवले.

त्या रात्री याकोब एकटाच होता. तेव्हा त्याला एक देवदूत दिसला! त्या देवदूताने त्याच्यासोबत कुस्ती करू लागला. त्यांची कुस्ती सकाळपर्यंत चालली. याकोबला यात मार लागला. पण तरी त्याने हार मानली नाही. तेव्हा तो देवदूत त्याला म्हणाला: ‘मला जाऊ दे.’ पण याकोब म्हणाला: ‘नाही! मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही.’

शेवटी त्या देवदूताने याकोबला आशीर्वाद दिला. आता याकोबला खात्री पटली, की यहोवा त्याचं रक्षण करेल आणि एसाव त्याला काहीही करणार नाही.

मग सकाळी याकोबने दुरून पाहिलं, की एसाव आणि त्याच्यासोबत ४०० पुरुष येत आहेत. याकोब त्याला भेटायला एकटाच पुढे गेला. त्याने सात वेळा जमिनीपर्यंत वाकून आपल्या भावाला नमस्कार केला. एसाव पळत-पळत याकोबकडे आला आणि त्याने त्याला मिठी मारली. दोघं खूप रडले. आता त्यांच्यातलं भांडण मिटलं होतं. या परिस्थितीत याकोबने त्यांचं भांडण मिटवण्यासाठी जे केलं त्याबद्दल यहोवाला कसं वाटलं असेल? तुला काय वाटतं?

त्यानंतर एसाव आणि याकोब आपआपल्या घरी गेले. याकोबला १२ मुलं होती. त्यांची नावं होती: रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा, दान, नफताली, गाद, आशेर, इस्साखार, जबुलून, योसेफ आणि बन्यामीन. यातला जो योसेफ होता त्याला यहोवाने आपल्या लोकांचा बचाव करण्यासाठी वापरलं. तुला माहीत आहे, नेमकं काय झालं त्या वेळी? चल पुढच्या धड्यात पाहू या.

“आपल्या शत्रूंवर प्रेम करत राहा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करत राहा; असं केल्यास, तुम्ही तुमच्या स्वर्गातील पित्याची मुलं असल्याचं सिद्ध कराल.”—मत्तय ५:४४, ४५