व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ १४

एक असा गुलाम ज्याने देवाचं ऐकलं

एक असा गुलाम ज्याने देवाचं ऐकलं

योसेफ हा याकोबचा मुलगा होता. याकोबला तो सर्वात जास्त आवडायचा आणि ही गोष्ट त्याच्या मोठ्या भावांनाही माहीत होती. तुला काय वाटतं, हे पाहून त्यांना कसं वाटत असेल? यामुळे ते योसेफवर खूप जळायचे आणि त्याचा रागही करायचे. योसेफला एकदा काही विचित्र स्वप्नं पडली, तेव्हा त्याने ती आपल्या भावांना सांगितली. त्या स्वप्नांचा अर्थ असा होता, की एक दिवस त्याचे भाऊ त्याला वाकून नमस्कार करतील. हे समजल्यावर ते त्याचा आणखीन जास्त राग करू लागले!

एक दिवस, योसेफचे भाऊ शखेम शहराजवळ मेंढरांची राखण करत होते. सगळंकाही ठीक आहे की नाही, हे पाहण्यासाठी याकोबने योसेफला त्यांच्याकडे पाठवलं. योसेफ येत आहे हे त्याच्या भावांनी दुरूनच पाहिलं. ते एकमेकांना बोलू लागले: ‘तो बघा, स्वप्न पाहणारा येत आहे. चला आज त्याला मारूनच टाकू या!’ त्यांनी त्याला लगेच पकडलं आणि एका खोल खड्ड्यात टाकून दिलं. पण, त्यांच्यातला यहूदा म्हणाला: ‘त्याला मारून टाकण्याऐवजी, आपण त्याला गुलाम म्हणून विकू या.’ मग त्यांना मिसरला (इजिप्तला) जाणारे मिद्यानी व्यापारी दिसले. त्यांनी योसेफला गुलाम म्हणून त्यांना विकलं. त्याबदल्यात व्यापाऱ्‍यांनी त्यांना चांदीची २० नाणी दिली.

मग योसेफच्या भावांनी त्याचा झगा बकरीच्या रक्‍तात बुडवला आणि तो त्यांच्या वडिलांकडे नेला. ते म्हणाले: ‘बाबा, हा योसेफचाच झगा आहे ना?’ तो पाहिल्यावर याकोबला वाटलं, की जंगलातल्या एखाद्या प्राण्याने योसेफवर हल्ला करून त्याला मारून टाकलं असावं. याकोब खूप-खूप दुःखी झाला. तो आपल्या मुलासाठी खूप रडला. त्याला कोणीही शांत करू शकलं नाही.

मिसरमध्ये योसेफला पोटीफर नावाच्या एका मोठ्या अधिकाऱ्‍याला विकण्यात आलं. पण यहोवा नेहमी योसेफसोबत होता. पोटीफरच्या लक्षात आलं, की योसेफ हा कामात खूप चांगला आणि प्रामाणिक आहे. त्यामुळे त्याने योसेफला त्याच्या सर्व संपत्तीवर अधिकार दिला.

पोटीफरच्या बायकोने पाहिलं, की योसेफ हा खूप सुंदर आणि ताकदवान आहे. त्यामुळे त्याने तिच्यासोबत झोपावं, असं ती त्याला रोज म्हणायची. अशा वेळी योसेफने काय केलं? त्याने तिला साफ नकार दिला. तो म्हणाला: ‘नाही! हे मी मुळीच करणार नाही. हे चुकीचं आहे! माझ्या मालकाचा माझ्यावर भरवसा आहे आणि तुम्ही त्यांच्या पत्नी आहात. मी जर तुमच्यासोबत झोपलो तर हे देवाविरुद्ध पाप केल्यासारखं होईल!’

पण, एक दिवस तर पोटीफरच्या बायकोने योसेफवर तिच्यासोबत झोपण्याची जबरदस्ती केली. तिने त्याला धरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो आपल्या अंगावरचा झगा तिथेच सोडून पळून गेला. जेव्हा पोटीफर घरी आला, तेव्हा ती त्याला खोटं बोलली. योसेफने माझ्यावर हल्ला केला, असं ती म्हणाली. हे ऐकून पोटीफर खूप चिडला. त्याने योसेफला जेलमध्ये टाकलं! पण, यहोवा नेहमी योसेफसोबत राहिला. तो त्याला विसरला नाही.

“म्हणून, देवाच्या सामर्थ्यवान हाताखाली स्वतःला नम्र करा, म्हणजे योग्य वेळी तो तुम्हाला सन्मानित करेल.” —१ पेत्र ५:६