व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ १५

यहोवा योसेफला विसरला नाही

यहोवा योसेफला विसरला नाही

योसेफ जेलमध्ये होता त्या वेळी मिसरचा राजा फारो याला स्वप्नं पडली. त्याच्या स्वप्नांचा अर्थ कोणीच सांगू शकलं नाही. तेव्हा फारोच्या एका सेवकाने त्याला सांगितलं, की योसेफ त्याच्या स्वप्नांचा अर्थ सांगू शकतो. फारोने लगेच योसेफला बोलावून घेतलं.

फारोने त्याला विचारलं: ‘तू माझ्या स्वप्नांचा अर्थ सांगू शकतोस का?’ तेव्हा योसेफने फारोच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला. तो त्याला म्हणाला: ‘सात वर्षांसाठी मिसरमध्ये भरपूर अन्‍न-धान्य असेल. पण, त्यानंतर सात वर्षांसाठी दुष्काळ पडेल. त्यामुळे अशी एक हुशार व्यक्‍ती निवडा जी अन्‍न-धान्य साठवण्याची व्यवस्था करेल, म्हणजे तुमचे लोक उपाशी मरणार नाही.’ फारो म्हणाला: ‘मी तुला निवडतो! मिसरमध्ये मी सर्वात शक्‍तिशाली आहे आणि आता मी तुला सर्व गोष्टींवर अधिकार देतो.’ पण, योसेफ फारोच्या स्वप्नांचा अर्थ कसा काय सांगू शकला? खरंतर, यहोवाने त्याला मदत केली होती.

पुढे सात वर्षांसाठी, योसेफने धान्य जमा करण्याचं काम पाहिलं. मग योसेफने सांगितलं होतं तसंच झालं. पूर्ण पृथ्वीवर दुष्काळ पडला. सगळीकडून लोक योसेफकडे अन्‍न विकत घेण्यासाठी येऊ लागले. त्याच्या वडिलांना म्हणजे याकोबलाही समजलं, की मिसरमध्ये धान्य मिळत आहे. त्यामुळे त्याने आपल्या दहा मुलांना तिथे धान्य विकत घेण्यासाठी पाठवलं.

याकोबची मुलं योसेफकडे आली. योसेफने त्यांना लगेच ओळखलं. पण त्यांनी मात्र योसेफला ओळखलं नाही. त्यांनी खाली वाकून त्याला नमस्कार केला. तरुण असताना योसेफला जे स्वप्न पडलं होतं, ते खरं झालं. आता योसेफला हे पाहायचं होतं, की त्याचे भाऊ अजूनही राग करणारे आहेत की सुधरले आहेत. त्यामुळे तो त्यांना म्हणाला: ‘मला माहीत आहे, तुम्ही गुप्तहेर आहात. आमचा देश कुठे कमजोर आहे हे पाहण्यासाठी तुम्ही आला आहात.’ तेवढ्यात ते म्हणाले: ‘नाही, नाही! तुमचा गैरसमज होत आहे. आम्ही कनानचे आहोत. आम्ही १२ भाऊ होतो. पण, आमचा एक भाऊ मेला आणि सर्वात लहान भाऊ आमच्या वडिलांसोबत आहे.’ योसेफ त्यांना म्हणाला: ‘तुम्ही आधी तुमच्या लहान भावाला माझ्याकडे घेऊन या, तेव्हाच मी तुमच्यावर विश्‍वास ठेवेन.’ त्यामुळे ते परत घरी आपल्या वडिलांकडे गेले.

जेव्हा त्यांच्याजवळ असलेलं अन्‍न संपलं, तेव्हा याकोबने त्याच्या मुलांना परत मिसरला पाठवलं. त्यांनी आपल्या लहान भावाला, बन्यामीनलाही आपल्यासोबत नेलं. पण, या वेळी योसेफने त्याच्या भावांची परीक्षा घेण्याचं ठरवलं. त्याने त्याचा चांदीचा पेला, बन्यामीनजवळ असलेल्या धान्याच्या गोणीत लपवला. मग त्याने त्याच्या भावांवर चोरीचा आरोप लावला. योसेफचे सेवक त्याचा पेला शोधू लागले. जेव्हा बन्यामीनच्या गोणीत पेला सापडला, तेव्हा त्याच्या भावांना धक्काच बसला. ते योसेफला खूप विनंती करून म्हणू लागले: ‘बन्यामीनला सोडून द्या आणि त्याच्या बदल्यात आम्हाला शिक्षा करा.’

आता योसेफची खात्री पटली, की त्याचे भाऊ खरंच बदलले आहेत. त्यामुळे त्याला खूप भरून आलं. तो रडू लागला आणि त्यांना म्हणाला: ‘मी योसेफ, तुमचा भाऊ. बाबा अजूनही जिवंत आहेत ना?’ हे ऐकून त्याच्या भावांना खूप आश्‍चर्य वाटलं. पण, योसेफ त्यांना पुढे म्हणाला: ‘तुम्ही माझ्यासोबत जे केलं त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका. कारण तुमचा जीव वाचवण्यासाठी, देवानेच मला इथे पाठवलं होतं. आता लवकर घरी जा आणि बाबांना इथे घेऊन या.’

ही चांगली बातमी आपल्या वडिलांना सांगण्यासाठी त्याचे भाऊ घरी परत गेले. मग ते आपल्या वडिलांना मिसरमध्ये घेऊन आले. शेवटी, खूप वर्षांनंतर योसेफ आपल्या वडिलांना पुन्हा भेटला.

“जर तुम्ही इतरांच्या चुकांची क्षमा केली नाही, तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही.”—मत्तय ६:१५