व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ १६

ईयोब कोण होता?

ईयोब कोण होता?

ऊस देशात यहोवाची उपासना करणारा एक पुरुष राहत होता. त्याचं नाव होतं ईयोब. तो खूप श्रीमंत होता आणि त्याचं कुटुंबही खूप मोठं होतं. तो दयाळू होता. तो गरिबांची, विधवांची आणि अनाथ मुलांची मदत करायचा. तो नेहमी चांगली कामं करायचा. पण याचा अर्थ त्याच्यावर कोणतीच समस्या आली नाही का?

ईयोबला माहीत नसलं, तरी दियाबल सैतानाचं त्याच्यावर लक्ष होतं. यहोवा सैतानाला म्हणाला: ‘माझ्या सेवकावर, ईयोबवर तुझं लक्ष गेलं का? या पृथ्वीवर त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही. मी सांगितलेलं सर्वकाही तो ऐकतो आणि नेहमी योग्य तेच करतो.’ सैतानाने उत्तर दिलं: ‘हो ऐकतो हे खरं आहे. पण ते उगाचंच नाही काही. तू त्याचं रक्षण करतोस आणि त्याला आशीर्वाद देतोस, म्हणून ऐकतो. तू त्याला जमिनी आणि भरपूर प्राणी दिलेस, नाही का? त्याच्याकडचं सर्व काही घेऊन टाक. मग बघ, तो तुझी उपासना करण्याचं कसं लगेच थांबवतो ते.’ त्यावर यहोवाने म्हटलं: ‘ठीक आहे, तू ईयोबची परीक्षा घेऊ शकतोस. पण लक्षात ठेव, त्याचा जीव घेण्याची मी तुला परवानगी देत नाही.’ यहोवाने सैतानाला ईयोबची परीक्षा का घेऊ दिली? कारण त्याला खात्री होती, की ईयोब या परीक्षेत नक्कीच यशस्वी होईल.

सैतानाने ईयोबवर बऱ्‍याच समस्या आणल्या आणि त्याची परीक्षा घेतली. सर्वात आधी त्याने शबाई लोकांना पाठवलं आणि त्यांनी ईयोबची गुरंढोरं आणि गाढवं चोरली. त्यानंतर, ईयोबची सर्व मेंढरं आगीत जळून मेली. मग, खासदी लोकांनी त्याचे उंट चोरले. तसंच, त्या प्राण्यांची देखरेख करणाऱ्‍या सेवकांचाही खून झाला. त्यानंतर तर ईयोबवर खूप मोठं संकट कोसळलं. त्याची सर्व मुलं एका घरात मेजवानीचा आनंद घेत होती. तेवढ्यात ते घर त्यांच्यावर पडलं आणि ती मरून गेली. ईयोब खूप-खूप दुःखी झाला. तरीसुद्धा, त्याने यहोवाची उपासना करण्याचं थांबवलं नाही.

सैतान इतक्यावरच थांबला नाही. त्याला ईयोबला आणखी जास्त त्रास द्यायचा होता. त्यामुळे त्याने असं काही केलं, की ईयोबचं शरीर मोठमोठ्या फोडांनी भरून गेलं. ईयोबला यामुळे खूप त्रास व्हायचा. त्याच्यासोबत हे सगळं का होत आहे, हे त्याला माहीत नव्हतं. तरीसुद्धा, ईयोब यहोवाची उपासना करत राहिला आणि देव हे पाहत होता. ईयोबने देवाचं मन आनंदित केलं.

सैतानाने मग तीन पुरुषांना ईयोबची परीक्षा घेण्यासाठी पाठवलं. ते त्याला म्हणाले: ‘तू नक्की काहीतरी पाप केलं असशील आणि ते लपवत असशील. त्यामुळेच देव तुला शिक्षा करत आहे.’ ईयोब म्हणाला: ‘नाही, मी काहीही चुकीचं केलेलं नाही.’ पण नंतर ईयोब असा विचार करू लागला, की यहोवाच त्याच्यावर ही सर्व संकटं आणत आहे. तो असंही म्हणाला, की देव त्याच्यासोबत अन्याय करत आहे.

अलीहू नावाचा एक तरुण पुरुष शांत बसून या सर्वांचं बोलणं ऐकत होता. त्यानंतर तो बोलू लागला. तो म्हणाला: ‘तुम्ही जे काही बोललात ते सर्व चुकीचं आहे. यहोवा खूप महान आहे. त्याला पूर्णपणे समजून घेणं आपल्याला शक्य नाही. तो कधीही दुष्टपणे वागत नाही. तो सर्वकाही पाहतो आणि जे लोक संकटांत असतात, त्यांना तो मदत करतो.’

मग यहोवा ईयोबशी बोलला. तो म्हणाला: ‘मी जेव्हा स्वर्ग आणि पृथ्वी बनवली, तेव्हा तू कुठे होतास? मी अन्याय करत आहे असं तू का बोलतोस? खरंतर, हे सर्व का घडत आहे हे तुला माहीत नाही.’ ईयोबने स्वतःची चूक कबूल केली आणि तो म्हणाला: ‘मी चुकलो. मी तुझ्याबद्दल फक्‍त ऐकलं होतं. पण, आता मी तुला खरोखर ओळखतो. खरंच, तुझ्यासाठी तर सर्वकाही शक्य आहे. मी जे बोललो त्यासाठी मला माफ कर.’

शेवटी ईयोबची परीक्षा संपली. यहोवाने त्याला बरं केलं. त्याच्याजवळ आधी जितकं होतं, त्याहूनही जास्त यहोवाने त्याला दिलं. ईयोब खूप वर्षं जगला. त्याचं जीवन आनंदात गेलं. यहोवाने ईयोबला खूप आशीर्वाद दिले. कारण, सोपं नसतानाही त्याने यहोवाच्या म्हणण्याप्रमाणे केलं होतं. मग परिस्थिती कशीही असली, तरी ईयोबसारखं तूही यहोवाची उपासना करत राहशील ना?

“ईयोबच्या धीराविषयी तुम्ही ऐकले आहे आणि शेवटी यहोवाने त्याला ज्या प्रकारे आशीर्वादित केले . . . हेही तुम्ही पाहिले आहे.”—याकोब ५:११