व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ १८

एक जळणारं झुडूप

एक जळणारं झुडूप

मोशेला मिद्यानात राहून आता ४० वर्षं झाली होती. या काळात त्याने लग्न केलं आणि त्याला मुलंही झाली. एक दिवस मोशे सीनाय डोंगराजवळ मेंढरं चारत होता, तेव्हा त्याला वेगळंच काहीतरी घडताना दिसलं. एका काटेरी झुडपाला आग लागली होती. पण आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे ते जळत नव्हतं! हा काय प्रकार आहे, हे बघण्यासाठी मोशे त्या झुडपाजवळ गेला. तितक्यात त्याला त्या झुडपातून आवाज ऐकू आला: ‘मोशे थांब! आणखी जवळ येऊ नको. आधी तुझ्या चपला काढ. कारण तू पवित्र जागेवर उभा आहेस.’ हा आवाज कोणाचा होता? यहोवा एका देवदूताद्वारे मोशेसोबत बोलत होता.

मोशे घाबरला. त्याने लगेच आपला चेहरा लपवला. मग यहोवा पुढे म्हणाला: ‘मी इस्राएली लोकांचे हाल पाहिले आहेत. मी त्यांना मिसरच्या लोकांपासून वाचवेन आणि एका चांगल्या जागी घेऊन जाईन. मिसरमधून माझ्या लोकांना बाहेर आणण्यासाठी मी तुला निवडलं आहे.’ हे ऐकून मोशेला तर आश्‍चर्याचा धक्काच बसला असेल, नाही का?

मोशे म्हणाला: ‘जर त्या लोकांनी विचारलं की तुला कोणी पाठवलं, तर मी त्यांना काय सांगू?’ देव म्हणाला: ‘त्यांना सांग, अब्राहामचा, इसहाकचा आणि याकोबचा देव यहोवा, याने मला पाठवलं आहे.’ त्यावर मोशेने विचारलं: ‘पण त्या लोकांनी माझं ऐकलं नाही तर?’ तेव्हा यहोवाने त्याला काही पुरावे दिले आणि दाखवून दिलं की तो त्याला मदत करेल. त्याने मोशेला म्हटलं: ‘तुझी काठी जमिनीवर टाक.’ बघतो तर काय, त्या काठीचा साप झाला! जेव्हा मोशेने त्या सापाला शेपटीने धरलं, तेव्हा तो परत काठी झाला. यहोवाने त्याला म्हटलं: ‘तू हा चमत्कार केलास तर त्यांची खात्री पटेल, की मीच तुला पाठवलं आहे.’

पण मोशे म्हणाला: ‘मला स्पष्ट बोलता येत नाही. लोकांसमोर काय बोलायचं ते मला सुचत नाही.’ यहोवाने त्याला धीर दिला: ‘काय बोलायचं हे मी तुला सांगेन आणि तुझी मदत करण्यासाठी मी तुझ्या भावाला, अहरोनला तुझ्यासोबत पाठवेन.’ मोशेला खात्री पटली, की यहोवा आपल्यासोबत आहे. त्यामुळे तो आपल्या बायकोला आणि मुलांना घेऊन मिसरला जायला निघाला.

“कसं बोलावं किंवा काय बोलावं याची काळजी करू नका; तुम्ही काय बोलावं हे त्या वेळी तुम्हाला सुचेल.”—मत्तय १०:१९