व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ १९

पहिल्या तीन पीडा

पहिल्या तीन पीडा

मिसरचे लोक इस्राएली लोकांकडून गुलामांसारखं खूप काम करून घ्यायचे. तेव्हा यहोवाने मोशेला आणि अहरोनला फारोकडे हा संदेश घेऊन पाठवलं: ‘माझ्या लोकांना जाऊ दे, म्हणजे ते ओसाड रानात जाऊन माझी उपासना करतील.’ फारोने अगदी गर्विष्ठपणे उत्तर दिलं: ‘यहोवा काहीही म्हणत असला, तरी मी इस्राएली लोकांना जाऊ देणार नाही.’ त्यानंतर तर फारोने इस्राएली लोकांवर आणखी जास्त काम टाकलं. फारोला चांगलाच धडा शिकवायला हवा, असं यहोवाने ठरवलं. तुला माहीत आहे यहोवाने काय केलं? त्याने मिसरवर दहा पीडा आणल्या. यहोवाने मोशेला म्हटलं: ‘फारो काही ऐकत नाही. म्हणून जेव्हा तो सकाळी नाईल नदीजवळ जाईल, तेव्हा तू त्याच्याकडे जा. त्याला सांग की त्याने माझ्या लोकांना जाऊ दिलं नाही, म्हणून आता नाईल नदीचं सर्व पाणी रक्‍त बनेल.’ यहोवाने सांगितल्याप्रमाणे मोशे फारोला भेटायला गेला. फारोने अहरोनला नाईल नदीवर काठी मारताना पाहिलं आणि नदीतलं पाणी रक्‍तात बदललं. नदीला घाणेरडा वास येऊ लागला, त्यातले सर्व मासे मेले. आता त्या नदीचं पाणी पिण्यासारखं राहिलं नव्हतं. इतकं सर्व घडलं, तरी फारोने इस्राएली लोकांना जाऊ दिलं नाही.

सात दिवस उलटले. यहोवाने मोशेला फारोकडे परत एक संदेश घेऊन पाठवलं: ‘तू जर माझ्या लोकांना सोडलं नाहीस, तर मिसर बेडकांनी भरून जाईल.’ फारोने तरीही इस्राएली लोकांना सोडलं नाही. म्हणून अहरोनने आपली काठी वर उचलली आणि बघता-बघता पूर्ण मिसर बेडकांनी भरून गेलं. लोकांच्या घरात, त्यांच्या पलंगावर, त्यांच्या भांड्यांमध्ये म्हणजे, जिथे पाहावं तिथे सगळीकडे बेडूकंच-बेडूक! फारोने मोशेला अगदी हात जोडून सांगितलं, की ही पीडा थांबव. इतकंच काय, तर फारोने वचनसुद्धा दिलं की तो इस्राएली लोकांना जाऊ देईल. म्हणून यहोवाने ती पीडा थांबवली. मिसरच्या लोकांनी सर्व मेलेल्या बेडकांना जमा केलं. अगदी ढीगच्या-ढीग जमा झाले. सगळीकडे नुसता घाणेरडा वास. पण परत तेच घडलं, फारोने इस्राएली लोकांना जाऊ दिलं नाही.

या वेळी यहोवा मोशेला म्हणाला: ‘अहरोनला काठी जमिनीवर मारायला सांग. त्यामुळे धूळीचे किडे बनतील. ते उडणारे किडे लोकांना चावतील.’ आणि तसंच घडलं. सगळीकडे किडे झाले. त्या वेळी फारोच्या लोकांनीसुद्धा त्याला म्हटलं: ‘ही पीडा देवाकडूनच आहे.’ पण तरीसुद्धा काहीच फायदा झाला नाही. फारोने इस्राएली लोकांना जाऊच दिलं नाही.

“मी . . . आपले सामर्थ्य त्यांना कळवेन; माझे नाव यहोवा आहे असे ते जाणतील.” —यिर्मया १६:२१, पं.र.भा.