व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ २०

पुढच्या सहा पीडा

पुढच्या सहा पीडा

मोशे आणि अहरोन देवाचा हा संदेश घेऊन फारोकडे जातात: ‘जर तू माझ्या लोकांना जाऊ दिलं नाहीस, तर मी पूर्ण देशात चावणाऱ्‍या माश्‍या पाठवेन.’ त्यानंतर, मिसरच्या सर्व लोकांच्या घरांत माश्‍या शिरल्या, मग ते गरीब असो वा श्रीमंत. जिथे बघावं तिथे माश्‍या. पण गोशेनमध्ये जिथे इस्राएली लोक राहत होते, तिथे मात्र या माश्‍या नव्हत्या. तिसऱ्‍या पीडेनंतर, सर्व पीडा फक्‍त मिसरच्या लोकांवरच आल्या. फारोने विनंती केली: ‘यहोवाला प्रार्थना करून सांग, की आमच्यावर दया कर. या माश्‍यांना दूर कर. मग तुझे लोक जाऊ शकतात.’ पण जेव्हा यहोवाने माश्‍यांना दूर केलं, तेव्हा फारोने आपलं मन बदललं. फारो नेमका कधी सुधरणार होता!

यहोवाने म्हटलं: ‘जर फारोने माझ्या लोकांना जाऊ दिलं नाही, तर मिसरच्या लोकांचे प्राणी आजारी पडून मरून जातील.’ दुसऱ्‍याच दिवशी त्यांचे प्राणी मरू लागले. पण इस्राएली लोकांचे प्राणी मात्र सुरक्षित होते, ते मेले नाहीत. इतकं होऊनसुद्धा फारोने आपला हट्ट काही सोडला नाही.

त्यानंतर यहोवाने मोशेला फारोकडे परत जायला सांगितलं आणि हवेत राख उडवायला सांगितली. त्या राखेची धूळ झाली आणि हवेत पसरली. ती धूळ मिसरच्या लोकांच्या शरीरावर बसली. त्यामुळे मिसरच्या लोकांच्या आणि त्यांच्या प्राण्यांच्या शरीरावर मोठमोठे फोड आले. त्या फोडांमुळे त्यांना खूप दुखू लागलं. पण, फारो काही बदलला नाही. त्याने इस्राएली लोकांना जाऊ दिलं नाही.

यहोवाने मोशेला परत फारोकडे हा संदेश घेऊन पाठवलं: ‘तू अजूनही माझ्या लोकांना जाऊ देत नाहीस ना! आता बघ, उद्या देशात गारांचा पाऊस पडेल.’ दुसऱ्‍या दिवशी यहोवाने गारांचा आणि आगीचा पाऊस पाडला. विजाही चमकत होत्या. मिसरमध्ये आलेलं हे सर्वात भयानक वादळ होतं. सर्व झाडांची आणि पिकांची नासधूस झाली. पण गोशेनमध्ये सर्वकाही सुरक्षित होतं. फारोने म्हटलं: ‘यहोवाला प्रार्थना करून, हे सर्व थांबवायला सांग. त्यानंतर तुम्ही जाऊ शकता.’ पण जसा गारांचा पाऊस थांबला, तसं फारोने लगेच आपलं मन बदललं.

त्यानंतर मोशे म्हणाला: ‘गारांपासून जे काही वाचलं आहे, ते टोळ म्हणजे नाकतोडे येऊन नष्ट करतील.’ मग लाखोंच्या संख्येने टोळ आले आणि त्यांनी झांडांवर आणि शेतात जे काही उरलं होतं, ते सर्व खाऊन टाकलं. फारोने विनंती केली: ‘कृपा करून यहोवाला सांग, की या टोळांना घालवून दे.’ यहोवाने टोळांना घालवून दिलं. पण तरीही फारोने आपला हट्टीपणा काही सोडला नाही.

यहोवाने मोशेला म्हटलं: ‘आपला हात आकाशाकडे वर उचल.’ असं केल्यावर लगेचच आकाशात काळोख पसरला. सगळीकडे नुसता मिट्ट काळोख! लागोपाठ तीन दिवस काळोख असल्यामुळे, मिसरच्या लोकांना काहीच दिसत नव्हतं. पण इस्राएली लोक जिथे राहत होते तिथे मात्र उजेड होता.

मग फारोने मोशेला म्हटलं: ‘तू आणि तुझे लोक जाऊ शकतात. पण प्राण्यांना नेऊ नकोस.’ यावर मोशेने म्हटलं: ‘आम्हाला प्राणी लागतील, नाहीतर आम्ही यहोवाला अर्पण कसं देणार?’ फारोला खूप राग आला. तो ओरडला: ‘चालता हो इथून! तू जर मला इथे परत दिसलास, तर तुला सोडणार नाही. मारून टाकेन तुला.’

“मग तुम्ही वळाल आणि धार्मिक व दुष्ट यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा यांच्यातला भेद तुम्हाला कळेल.”—मलाखी ३:१८