व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ २५

उपासनेसाठी निवासमंडप

उपासनेसाठी निवासमंडप

मोशे सीनाय डोंगरावर होता, तेव्हा यहोवाने त्याला एक निवासमंडप बनवायला सांगितला. निवासमंडप म्हणजे एक खास प्रकारचा तंबू. एक असा तंबू, जिथे इस्राएली लोक यहोवाची उपासना करू शकणार होते. तसंच, तो सहज आपल्यासोबत नेऊ शकणार होते.

यहोवाने मोशेला सांगितलं: ‘लोकांना सांग की निवासमंडप बनवण्यासाठी ते जे काही देऊ शकतात, ते देऊन त्यांनी मदत करावी.’ मग इस्राएली लोकांनी सोनं, चांदी, मौल्यवान रत्नं आणि दागिने दिले. तसंच त्यांनी लोकर, कापड, प्राण्यांची कातडी आणि इतरही बऱ्‍याच गोष्टी दिल्या. त्यांनी उदारता दाखवून भरपूर वस्तू दिल्या. इतक्या, की मोशेला त्यांना सांगावं लागलं: ‘आता आपल्याकडे भरपूर वस्तू झाल्या आहेत. बस करा, आणखीन वस्तू आणू नका.’

कामात हुशार असलेल्या बऱ्‍याच पुरुषांनी आणि स्त्रियांनी निवासमंडप बनवण्यात मदत केली. यहोवाने त्यांना काम करण्यासाठी आणखी बुद्धी दिली. काहींनी दोरा तर काहींनी कापड विणण्याचं काम केलं. इतर काहींनी कापडावर भरतकाम केलं. शिवाय, असेही काही होते ज्यांनी दगडं रचण्याचं, सोन्यावर आणि लाकडावर नक्षी कोरण्याचं काम केलं.

यहोवाने जसं सांगितलं होतं, अगदी तसाच निवासमंडप लोकांनी बांधला. त्या निवासमंडपाचे दोन भाग होते. एका भागाला पवित्र तर दुसऱ्‍या भागाला परमपवित्र स्थान असं म्हटलं जायचं. या दोन्ही भागांना वेगळं करण्यासाठी मध्ये एक सुंदरसा पडदा लावण्यात आला होता. परमपवित्र स्थानात कराराचा कोश ठेवण्यात आला होता. हा कराराचा कोश बाभळीच्या लाकडाने आणि सोन्याने बनवलेला होता. पवित्र या भागात एक टेबल, दिवे लावण्यासाठी सोन्याचा दीपवृक्ष आणि धूप जाळण्यासाठी एक वेदीही होती. तर, अंगणात एक मोठी वेदी आणि पाणी भरून ठेवण्यासाठी एक मोठं भांडं होतं. यहोवाचं ऐकण्याचं जे वचन इस्राएली लोकांनी दिलं होतं, त्याची आठवण त्यांना परमपवित्र भागात ठेवलेल्या कराराच्या कोशामुळे व्हायची. पण तुला माहीत आहे, करार म्हणजे काय? करार म्हणजे एखाद्याला दिलेलं खास वचन.

निवासमंडपात याजक म्हणून काम करण्यासाठी यहोवाने अहरोन आणि त्याच्या मुलांना निवडलं. निवासमंडपाची काळजी घेण्याचं आणि यहोवाला अर्पण देण्याचं काम त्यांना देण्यात आलं होतं. पण, निवासमंडपाच्या परमपवित्र स्थानात जाण्याची परवानगी फक्‍त महायाजक अहरोनलाच होती. तो वर्षातून एकदाच तिथे जायचा. त्या दिवशी तो स्वतःच्या, त्याच्या कुटुंबाच्या आणि संपूर्ण इस्राएल राष्ट्राच्या पापांसाठी देवापुढे बलिदान अर्पण करायचा.

मिसर सोडल्याच्या एका वर्षानंतर इस्राएली लोकांनी निवासमंडप बनवण्याचं काम संपवलं. आता त्यांच्याकडे यहोवाच्या उपासनेसाठी एक जागा होती.

निवासमंडप पाहून यहोवाला आनंद झाला. हे दाखवण्यासाठी त्याने निवासमंडपावर एक ढग आणला. जोपर्यंत तो ढग निवासमंडपावर असायचा, तोपर्यंत इस्राएली लोक आहे त्या ठिकाणीच राहायचे. पण, जेव्हा तो ढग वर जायचा तेव्हा लोकांना समजायचं, की आता या ठिकाणाहून पुढे जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे, ते निवासमंडपाचे भाग वेगवेगळे करायचे आणि ते सोबत घेऊन ढग जिथे-जिथे जायचा तिथे-तिथे त्याच्या मागोमाग जायचे.

“मग, राजासनातून एक मोठा आवाज मला ऐकू आला, जो म्हणाला: ‘पाहा! देवाचा तंबू मानवांजवळ आहे, तो त्यांच्यासोबत राहील आणि ते त्याचे लोक होतील. आणि देव स्वतः त्यांच्यासोबत असेल.’”—प्रकटीकरण २१:३