व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ २७

त्यांनी यहोवाविरुद्ध बंड केलं

त्यांनी यहोवाविरुद्ध बंड केलं

इस्राएली लोक रानात राहू लागल्याच्या काही काळानंतर कोरह, दाथान, अबीराम आणि इतर २५० पुरुषांनी मोशे आणि अहरोनविरुद्ध बंड केलं. म्हणजे ते त्यांच्या विरोधात उभे राहिले. त्यांनी मोशेला आणि अहरोनला म्हटलं: ‘पुरे झालं तुमचं! का म्हणून फक्‍त तूच आमचं मार्गदर्शन करायचं? आणि फक्‍त अहरोनच महायाजक का असायला हवा? यहोवा फक्‍त तुझ्या आणि अहरोनसोबतच नाही, तर तो आमच्या सर्वांसोबत आहे!’ पण यहोवाला ही गोष्ट आवडली नाही. यहोवाच्या नजरेत ते त्याच्याविरुद्धच बंड करत होते.

कोरह आणि त्याच्या साथीदारांना मोशे म्हणाला: ‘तुम्ही उद्या निवासमंडपात या आणि येताना सोबत तुमचं धूप जाळण्याचं भांडं आणि त्यात धूप घेऊन या. यहोवाने कोणाला निवडलं आहे, हे तोच दाखवून देईल.’

दुसऱ्‍या दिवशी कोरह आणि त्याचे २५० साथीदार मोशेला भेटायला निवासमंडपात गेले. तिथे आल्यावर त्यांनी धूप जाळला. ते असे वागत होते, जणू काय ते याजकच आहेत. यहोवाने मोशेला आणि अहरोनला म्हटलं: ‘कोरह आणि त्याच्या साथीदारांपासून वेगळे व्हा.’

कोरह निवासमंडपात गेला. पण दाथान, अबीराम आणि त्यांच्या कुटुंबांनी तिथे जायला नकार दिला. म्हणून यहोवाने इस्राएली लोकांना सांगितलं की त्यांनी कोरह, दाथान आणि अबीराम यांच्या तंबूंपासून लांब व्हावं. इस्राएली लोक लगेचच, त्यांच्यापासून दूर झाले. दाथान, अबीराम आणि त्यांची कुटुंबं त्यांच्या तंबूंच्या बाहेर उभी होती. त्या वेळी अचानक, जमिनीचे दोन भाग झाले आणि ते सर्व आत पडले आणि मेले. निवासमंडपात, कोरह आणि त्याच्या २५० साथीदारांवर स्वर्गातून आग आली आणि ते सर्व जळून राख झाले!

त्यानंतर यहोवाने मोशेला म्हटलं: ‘प्रत्येक कुळात जी मुख्य व्यक्‍ती आहे, तिच्याकडून एक-एक काठी घे आणि त्या काठीवर तिचं नाव लिही. पण लेवी कुळाच्या काठीवर अहरोनचं नाव लिही. त्या सर्व काठ्या घे आणि त्या निवासमंडपात ठेव. ज्याला मी निवडलं आहे त्याच्या काठीला फुलं येतील.’

दुसऱ्‍या दिवशी मोशेने सर्व काठ्या बाहेर आणल्या आणि कुळाच्या मुख्य व्यक्‍तींना त्या दाखवल्या. पाहिलं तर काय, फक्‍त अहरोनच्या काठीलाच फुलं आली होती! त्यावर पिकलेले बदामसुद्धा होते. अशा प्रकारे यहोवाने दाखवून दिलं, की त्याने अहरोनलाच महायाजक म्हणून निवडलं होतं.

“जे तुमचे नेतृत्व करत आहेत त्यांच्या आज्ञा पाळा आणि त्यांच्या अधीन राहा.” —इब्री लोकांना १३:१७