व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ २८

बलामची गाढवी बोलते

बलामची गाढवी बोलते

इस्राएली लोकांना रानात जवळपास ४० वर्षं झाली होती. या काळात त्यांनी आसपासची बरीचशी शहरं जिंकली. आता ते यार्देन नदीच्या पूर्वेकडे मवाब देशाजवळ तंबू बांधून राहत होते. थोड्याच दिवसांत वचन दिलेल्या देशात ते प्रवेश करणार होते. मवाबचा राजा बालाक याला भीती होती, की आता इस्राएली लोक मवाबसुद्धा जिंकतील. त्यामुळे त्याने बलाम नावाच्या एका व्यक्‍तीला मवाबला यायला सांगितलं. त्याची इच्छा होती की बलामने इस्राएली लोकांना शाप द्यावा, म्हणजेच त्यांचं काहीतरी वाईट होईल असं बोलावं.

पण यहोवाने बलामला म्हटलं: ‘तू इस्राएली लोकांना शाप देऊ नकोस.’ म्हणून मग बलाम गेला नाही. पण बालाक राजाने त्याला दुसऱ्‍यांदा बोलवलं आणि हवं ते देण्याचं वचनही दिलं. पण या वेळीसुद्धा बलाम गेला नाही. मग देवाने त्याला सांगितलं: ‘तू जाऊ शकतोस पण एका अटीवर. तिथे गेल्यावर मी जे सांगेन फक्‍त तेच तू बोलायचं.’

बलाम आपल्या गाढवीवर बसला आणि मवाबला जायला निघाला. यहोवाने त्याला सांगितलं होतं, की तू शाप देऊ नको. पण तरीही त्याने इस्राएली लोकांना शाप द्यायचं ठरवलं होतं. मवाबला जात असताना यहोवाचा देवदूत तीन वेळा त्यांच्यासमोर आला. बलामला तो दिसला नाही, पण त्याच्या गाढवीला मात्र तो दिसला. त्यामुळे पहिल्यांदा ती गाढवी रस्त्यावरून उतरून शेतात गेली. दुसऱ्‍यांदा ती एका दगडी भिंतीच्या इतक्या जवळ गेली, की बलामचा पायच अडकला. शेवटी जेव्हा तो देवदूत पुन्हा दिसला, तेव्हा तर ती रस्त्याच्या मधोमध बसूनच गेली. या तिन्ही वेळा बलामने तिला काठीने मारलं.

पण तिसऱ्‍या वेळी यहोवाने त्या गाढवीला बोलायला लावलं. त्या गाढवीने बलामला विचारलं: ‘तू मला सारखं-सारखं का मारत आहेस?’ त्यावर बलामने म्हटलं: ‘लोकांना वाटेल की मी अगदी मूर्ख आहे. माझ्याकडे तलवार असती ना, तर मी तुला मारूनच टाकलं असतं.’ त्यावर गाढवीने म्हटलं: ‘मी इतकी वर्षं तुझ्यासोबत आहे, तू कितीतरी वेळा माझ्यावर बसून प्रवास केला. याआधी मी कधी अशी वागले का?’

मग यहोवाने असं काहीतरी केलं, ज्यामुळे बलामलासुद्धा देवदूत दिसू लागला. त्या देवदूताने म्हटलं: ‘इस्राएली लोकांना शाप देऊ नकोस, असं यहोवाने तुला सांगितलं होतं ना?’ हे ऐकून बलाम घाबरला आणि म्हणाला: ‘माझं चुकलं. मी जातो परत घरी.’ पण देवदूताने म्हटलं: ‘तू मवाबला जाऊ शकतोस. पण यहोवा जे सांगेल फक्‍त तेच तू बोल.’

बलामला आपली चूक आता तरी कळली का? नाही. यानंतरही बलामने तीन वेळा इस्राएली लोकांना शाप द्यायचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी यहोवाने त्याला शाप नाही, तर आशीर्वादच द्यायला लावला. काही काळाने इस्राएली लोकांनी मवाबच्या लोकांसोबत लढाई केली आणि त्यात बलामही मेला. बलामने यहोवाचं ऐकलं असतं तर किती बरं झालं असतं, नाही का?

“सर्व प्रकारच्या लोभापासून सांभाळा, कारण एखाद्याकडे भरपूर संपत्ती असली, तरी त्याची संपत्ती त्याला जीवन देऊ शकत नाही.” —लूक १२:१५