व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ३२

एक नवीन मार्गदर्शक आणि दोन धाडसी स्त्रिया

एक नवीन मार्गदर्शक आणि दोन धाडसी स्त्रिया

यहोशवाने खूप वर्षं यहोवाच्या लोकांचं मार्गदर्शन केलं. ११० वर्षांचा झाल्यानंतर तो मरून गेला. तो जिवंत होता, तोपर्यंत इस्राएली लोक यहोवाची उपासना करायचे. पण यहोशवा मेल्यानंतर, ते कनानी लोकांसारखं मूर्तींची उपासना करू लागले. इस्राएली लोकांनी यहोवाला सोडलं. त्यामुळे, यहोवाने कनानच्या याबीन राजाला त्यांचा छळ करू दिला. मग इस्राएली लोकांनी मदतीसाठी यहोवाला विनंती केली. म्हणून यहोवाने त्यांच्यासाठी एक नवीन मार्गदर्शक निवडला. त्याचं नाव होतं, बाराक. तो त्यांना यहोवाकडे परत येण्यासाठी मदत करणार होता.

त्या काळात दबोरा नावाची एक संदेष्ट्री होती. ती देवाचा संदेश सांगायची. तिने बाराकला बोलवलं आणि त्याला यहोवाचा संदेश सांगितला. ती म्हणाली: ‘आपल्यासोबत १०,००० पुरुषांना घे. कीशोन नदीजवळ जिथे याबीनचे सैनिक आहेत तिथे जा. तिथे तू याबीनचा सेनापती सीसरा याला हरवशील.’ त्यावर बाराकने दबोराला म्हटलं: ‘तू माझ्याबरोबर येशील तरच मी जाईन, नाहीतर जाणार नाही.’ ती म्हणाली: ‘मी येईन तुझ्यासोबत. पण एक गोष्ट लक्षात ठेव. सीसरा तुझ्या हातून मरणार नाही. यहोवाने सांगितलं आहे, की एक स्त्री त्याला मारून टाकेल.’

बाराक आणि त्याचे सैनिक लढाईची तयारी करण्यासाठी ताबोर डोंगरावर गेले. दबोराही त्यांच्यासोबत गेली. सीसराला ही गोष्ट कळली तेव्हा त्याने लगेच तयारी केली. त्याने ताबोर डोंगराखालच्या दरीत आपले सर्व सैनिक आणि लढाईचे रथ तयार ठेवले. दबोरा बाराकला म्हणाली: ‘आज या लढाईत यहोवा तुलाच जिंकू देईल.’ हे ऐकून बाराक आणि त्याचे १०,००० पुरुष, उत्साहाने सीसराच्या शक्‍तिशाली सैन्याशी लढायला खाली उतरले.

यहोवाने कीशोन नदीत पूर आणला. त्यामुळे सीसराच्या रथांची चाकं चिखलात अडकली. सीसरा आपला रथ सोडून पळू लागला. बाराक आणि त्याच्या सैनिकांनी सीसराच्या सैनिकांना हरवलं. पण ते सीसराला पकडू शकले नाहीत. पळता-पळता सीसरा याएल नावाच्या एका स्त्रीच्या तंबूत जाऊन लपला. तो दमला होता म्हणून याएलने त्याला प्यायला दूध दिलं. नंतर तिने त्याच्या अंगावर पांघरूण घातलं आणि त्याला गाढ झोप लागली. मग याएलने तंबूचा एक मोठा खिळा घेतला. ती हळूच सीसराजवळ गेली आणि तिने त्याच्या डोक्यात तो खिळा ठोकला. सीसरा जागीच मरून गेला!

बाराक सीसराला शोधत-शोधत याएलच्या तंबूपर्यंत पोचला. याएल बाहेर येऊन त्याला म्हणाली: ‘आत ये. तू ज्या माणसाला शोधत आहेस, तो आत आहे.’ बाराक तंबूत गेला आणि पाहतो तर काय, सीसरा मरून पडला होता! यहोवाने इस्राएली लोकांना त्यांच्या शत्रूंवर विजय मिळवून दिला होता. म्हणून बाराक आणि दबोरा यांनी यहोवासाठी गीत गाऊन त्याची स्तुती केली. पुढच्या ४० वर्षांपर्यंत इस्राएल देशात शांती होती.

“वार्ता प्रसिद्ध करणाऱ्‍या स्त्रियांची मोठी सेना” आहे.—स्तोत्र ६८:११