व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ३४

गिदोन मिद्यानी लोकांना हरवतो

गिदोन मिद्यानी लोकांना हरवतो

काही काळानंतर इस्राएली लोक यहोवापासून पुन्हा दूर गेले. ते खोट्या देवतांची उपासना करू लागले. सात वर्षांपर्यंत मिद्यानी लोकांनी इस्राएली लोकांना खूप त्रास दिला. त्यांनी त्यांचे प्राणी चोरले आणि त्यांच्या पिकांचाही नाश केला. त्या लोकांपासून वाचण्यासाठी इस्राएली लोक डोंगरांत आणि गुहेत जाऊन लपायचे. मिद्यानी लोकांपासून त्यांचा बचाव व्हावा, यासाठी त्यांनी यहोवाला खूप विनंती केली. म्हणून यहोवाने गिदोन नावाच्या एका तरुण माणसाकडे, त्याचा एक देवदूत पाठवला. तो देवदूत गिदोनला म्हणाला: ‘यहोवाने तुला एक शक्‍तिशाली सैनिक होण्यासाठी निवडलं आहे.’ यावर गिदोनने विचारलं: ‘मी तर एक साधारण माणूस आहे. मी कसं काय इस्राएली लोकांना वाचवू शकतो?’

पण यहोवाने आपल्याला खरंच निवडलं आहे, हे गिदोनला कसं समजणार होतं? यासाठी गिदोनने लोकरीचा एक तुकडा जमिनीवर ठेवला आणि यहोवाला म्हटलं: ‘उद्या सकाळी जर या लोकरीच्या तुकड्यावर दव पडून तो ओला झाला आणि जमीन कोरडी राहिली, तर मी समजेन की तू मला इस्राएली लोकांना वाचवण्यासाठी निवडलं आहे.’ दुसऱ्‍या दिवशी सकाळी असंच घडलं. लोकरीचा तुकडा पूर्ण भिजला होता आणि जमीन मात्र कोरडी होती! पण गिदोनने पुन्हा एकदा यहोवाला विनंती केली. त्याने या वेळी यहोवाला असं म्हटलं, की त्याने दुसऱ्‍या दिवशी सकाळी लोकर कोरडी ठेवावी आणि जमीन ओली करावी. जेव्हा तसंच घडलं तेव्हा गिदोनची खात्री पटली, की यहोवाने त्यालाच निवडलं आहे. त्यानंतर, मिद्यानी लोकांसोबत लढण्यासाठी त्याने आपल्या सैनिकांना जमा केलं.

यहोवाने गिदोनला म्हटलं: ‘तुझ्याकडे खूप सैनिक आहेत. म्हणून लढाई जिंकल्यावर कदाचित तुला वाटेल, की तू स्वतःच्या हिमतीवर ती जिंकला आहेस. पण खरंतर, इस्राएली लोकांना या लढाईत मी विजय मिळवून देणार आहे. म्हणून ज्या सैनिकांना भीती वाटते, त्यांना घरी जायला सांग.’ त्यामुळे २२,००० सैनिक घरी परत गेले आणि फक्‍त १०,००० सैनिक त्याच्यासोबत थांबले. त्यानंतर यहोवा म्हणाला: ‘आताही तुझ्याकडे बरेच सैनिक आहेत. त्या सर्वांना झऱ्‍याजवळ घेऊन ये. त्यांना झऱ्‍यातून पाणी प्यायला सांग. जे सैनिक पाणी पिताना शत्रू येत आहेत की नाही, याकडे लक्ष देतील, अशांनाच निवड.’ फक्‍त ३०० पुरुष पाणी पिताना आजूबाजूला लक्ष देत होते. पण यहोवाने वचन दिलं, की या पुरुषांची संख्या जरी कमी असली, तरी ते १,३५,००० (एक लाख पस्तीस हजार) मिद्यानी सैनिकांना हरवतील.

त्या रात्री यहोवाने गिदोनला म्हटलं: ‘मिद्यानी लोकांवर हल्ला करण्याची हीच वेळ आहे!’ गिदोनने त्याच्या प्रत्येक सैनिकाला कर्णा आणि मातीचं मोठं भांडं दिलं. मग त्या भांड्यांमध्ये आगीच्या मशाली लपवून ठेवायला त्याने सांगितलं. गिदोनने त्यांना म्हटलं: ‘माझ्याकडे लक्ष द्या. मी जसं करेन, तसंच तुम्ही करा.’ गिदोनने कर्णा वाजवला आणि मातीचं भांडं फोडलं. त्यानंतर त्याने मशाल हातात घेऊन इकडून-तिकडे हलवली आणि जोरात ओरडून म्हटलं: ‘यहोवा आणि गिदोनची तलवार!’ त्याच्या सर्व ३०० सैनिकांनीसुद्धा तसंच केलं. हे ऐकून मिद्यानी लोक घाबरले. ते इकडे-तिकडे पळू लागले. या गडबडीत मिद्यानी लोकांनी एकमेकांवरच हल्ला केला! यहोवाने पुन्हा एकदा इस्राएली लोकांना त्यांच्या शत्रूंवर विजय मिळवून दिला.

“यासाठी की, आमच्याजवळ असलेले असाधारण सामर्थ्य आमचे स्वतःचे नसून, देवाचे आहे हे दिसून यावे.”—२ करिंथकर ४:७