व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ३६

इफ्ताहचं वचन

इफ्ताहचं वचन

इस्राएली लोकांनी परत एकदा यहोवाला सोडलं. ते खोट्या देवतांची उपासना करू लागले. अम्मोनी लोकांनी इस्राएली लोकांवर हल्ला केला आणि त्यांच्यासोबत लढाई केली. पण, त्या खोट्या देवांनी इस्राएली लोकांची मदत केली नाही. इस्राएली लोकांनी अनेक वर्षांपर्यंत त्रास सहन केला. शेवटी त्यांनी यहोवाला अशी प्रार्थना केली: ‘आम्ही तुझ्याविरुद्ध पाप केलं आहे. कृपा करून आम्हाला आमच्या शत्रूंपासून वाचव.’ मग इस्राएली लोकांनी त्यांच्याजवळ असलेल्या मूर्ती नष्ट केल्या. ते परत यहोवाची उपासना करू लागले. त्यांचा त्रास पाहून यहोवाला खूप वाईट वाटलं.

अम्मोनी लोकांसोबत लढण्यासाठी इफ्ताह नावाच्या एका शूर सैनिकाला निवडण्यात आलं. तो इस्राएली सैन्याचा सेनापती असणार होता. त्याने यहोवाला विनंती केली: ‘आम्हाला ही लढाई जिंकायला मदत कर. जर आम्ही जिंकलो तर मी तुला वचन देतो, की घरी गेल्यावर जो कोणी सर्वात आधी मला भेटायला बाहेर येईल, त्याला मी तुला देईन.’ यहोवाने इफ्ताहची प्रार्थना ऐकली. यहोवाने लढाई जिंकायला त्यांना मदत केली.

इफ्ताह घरी परत आला. सर्वात आधी त्याची मुलगीच त्याला भेटायला आली. ती त्याची एकुलती एक मुलगी होती! ती डफ वाजवत आणि नाचत त्याला भेटायला आली. मुलीला पाहून इफ्ताहला कसं वाटलं असेल? त्याला त्याचं वचन आठवलं. तो तिला म्हणाला: ‘माझ्या मुली! तू मला किती मोठं दुःख दिलं आहेस. मी यहोवाला एक वचन दिलं आहे. त्यामुळे, तुला शिलोमधल्या निवासमंडपात जावं लागेल. तिथेच तुला जीवनभर राहावं लागेल.’ यावर त्याची मुलगी म्हणाली: ‘बाबा, तुम्ही यहोवाला वचन दिलं आहे ना? मग ते तुम्ही पूर्ण केलंच पाहिजे. पण, त्याआधी मला दोन महिन्यांसाठी माझ्या मैत्रिणींसोबत जाऊ द्या. आम्ही डोंगरांमध्ये राहू. मग मी जाईन.’ त्यानंतर, इफ्ताहची मुलगी विश्‍वासूपणे निवासमंडपात यहोवाची सेवा करू लागली. तिने आयुष्यभर तिथे सेवा केली. तिच्या मैत्रिणी दरवर्षी तिला भेटायला जायच्या.

“ज्याचं माझ्यापेक्षा आपल्या मुलावर किंवा मुलीवर जास्त प्रेम आहे तो माझा शिष्य होण्यास योग्य नाही.”—मत्तय १०:३७