व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ३८

यहोवा शमशोनला शक्‍तिशाली बनवतो

यहोवा शमशोनला शक्‍तिशाली बनवतो

अनेक इस्राएली लोक परत मूर्तींची उपासना करू लागले. त्यामुळे यहोवाने पलिष्टी लोकांना त्यांच्यावर राज्य करू दिलं. पण असेही काही इस्राएली लोक होते, ज्यांचं यहोवावर प्रेम होतं. त्यांच्यातला एक होता मानोहा. त्याला आणि त्याच्या बायकोला मूलबाळ नव्हतं. एक दिवशी यहोवाने एका देवदूताला मानोहाच्या बायकोकडे पाठवलं. त्या देवदूताने तिला म्हटलं: ‘तुला एक मुलगा होईल. तो इस्राएली लोकांना पलिष्टी लोकांपासून वाचवेल. तो एक नाजीर असेल.’ नाजीर म्हणजे कोण हे तुला माहीत आहे? नाजीर म्हणजे देवाचा खास सेवक. त्याला आपले केस कापण्याची परवानगी नव्हती.

काही काळानंतर, मानोहाला मुलगा झाला. त्याने त्याचं नाव शमशोन ठेवलं. जेव्हा शमशोन मोठा झाला, तेव्हा यहोवाने त्याला खूप शक्‍तिशाली बनवलं. त्याच्यात इतकी शक्‍ती होती, की तो कुठलंही हत्यार न वापरता एका सिंहालासुद्धा मारून टाकू शकत होता! एकदा तर, त्याने एकट्यानेच ३० पलिष्टी लोकांना मारून टाकलं. पलिष्टी लोकांना त्याचा खूप राग यायचा. त्यामुळे ते त्याला मारून टाकण्याची संधी शोधत राहायचे. एकदा शमशोन गज्जा शहरामध्ये होता. तो रात्री झोपलेला असताना, पलिष्टी लोक त्या शहराच्या दाराजवळ थांबून राहिले. त्यांनी ठरवलं की सकाळी शमशोन दाराजवळ आला, तर त्याला मारून टाकायचं. पण शमशोन मध्यरात्रीच उठला. तो शहराच्या दाराजवळ गेला. त्याने भिंतीला लागून असलेलं ते मोठं आणि जड दार तोडलं. मग त्याने ते दार आपल्या खांद्यावर घेतलं आणि तो हेब्रोनच्या जवळ असलेल्या डोंगरावर गेला!

शमशोनचं एका मुलीवर प्रेम होतं. तिचं नाव होतं दलीला. पलिष्टी लोक तिच्याकडे गेले आणि तिला म्हणाले: ‘शमशोनकडे इतकी शक्‍ती का आहे हे तू शोधून काढलंस, तर आम्ही तुला खूपसारे पैसे देऊ. आम्ही त्याला पकडून जेलमध्ये टाकून देऊ.’ दलीलाने हो म्हटलं, कारण तिला पैसे हवे होते. तो इतका शक्‍तिशाली का आहे हे जेव्हा तिने शमशोनला सुरुवातीला विचारलं, तेव्हा त्याने सांगितलं नाही. पण ती सारखं-सारखं त्याला विचारत राहिली. मग कंटाळून त्याने तिला सांगून टाकलं. तो म्हणाला: ‘मी एक नाजीर आहे. त्यामुळे माझे केस कधीच कापले गेले नाहीत. पण जर माझे केस कापले, तर माझी शक्‍ती निघून जाईल.’ शमशोनने खूप मोठी चूक केली. त्याने तिला ते सांगायला नको होतं ना?

दलीलाने लगेच पलिष्टी लोकांना जाऊन सांगितलं: ‘शमशोन शक्‍तिशाली का आहे, हे मला समजलं आहे!’ मग जेव्हा शमशोन तिच्यासोबत होता, तेव्हा तिने त्याचं डोकं मांडीवर ठेवून त्याला झोपवलं. त्यानंतर तिने त्याचे केस कापण्यासाठी कोणालातरी बोलवलं. त्याचे केस कापल्यानंतर दलीला ओरडली: ‘शमशोन उठ! पलिष्टी आले!’ शमशोन उठला. पण आता त्याची शक्‍ती निघून गेली होती. पलिष्टी लोकांनी त्याला पकडलं. त्यांनी त्याचे डोळे फोडले आणि त्याला जेलमध्ये टाकून दिलं.

त्यानंतर एक दिवशी पलिष्टी लोक त्यांच्या दागोन देवाच्या मंदिरात जमा झाले. तिथे ते असं ओरडत होते: ‘आमच्या देवानेच शमशोनला आमच्या ताब्यात दिलं आहे! बाहेर आणा त्या शमशोनला! आपण त्याला चिडवू या.’ ते त्याला घेऊन आले. त्यांनी त्याला दोन मोठमोठ्या खांबांच्या मध्ये उभं केलं. ते त्याला चिडवू लागले. मग शमशोन असं ओरडला: ‘हे यहोवा, मला फक्‍त आणखीन एकदा शक्‍ती दे.’ आणि आता तर शमशोनचे केससुद्धा वाढले होते. यहोवाने त्याला शक्‍ती दिली आणि त्याने मंदिराच्या खांबांना पूर्ण जोर लावून धक्का दिला. त्यामुळे मंदिर कोसळलं. तिथे असलेले सर्व लोक मेले. त्यांच्यासोबत शमशोनसुद्धा मेला.

“जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे सर्व गोष्टी करण्याची मला शक्‍ती मिळते.”—फिलिप्पैकर ४:१३