व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ३९

इस्राएलचा पहिला राजा

इस्राएलचा पहिला राजा

यहोवाने इस्राएली लोकांचं मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना न्यायाधीश दिले होते. पण, त्यांना एक राजा हवा होता. म्हणून ते शमुवेलला म्हणाले: ‘आपल्या आसपासच्या सर्व राष्ट्रांकडे राजे आहेत. आम्हालाही एक राजा हवा.’ त्यांची मागणी चुकीची आहे, असं शमुवेलला वाटलं. म्हणून त्याने याबद्दल यहोवाला प्रार्थना केली. यहोवा शमुवेलला म्हणाला: ‘हे लोक तुला नाही, तर मला नाकारत आहेत. त्यांना सांग की त्यांना एक राजा मिळेल. पण, तो त्यांच्याकडून खूपसाऱ्‍या गोष्टी मागेल.’ ही गोष्ट माहीत झाल्यानंतरही लोक म्हणाले: ‘काहीही असो. आम्हाला एक राजा पाहिजे.’

यहोवाने शमुवेलला सांगितलं, की शौल नावाचा पुरुष पहिला राजा असेल. शौल शमुवेलला भेटायला रामा नावाच्या ठिकाणी गेला. तेव्हा शमुवेलने त्याच्या डोक्यावर तेल ओतून त्याला राजा बनवलं.

आता शमुवेलला इस्राएली लोकांना त्यांचा नवीन राजा दाखवायचा होता. त्यामुळे त्याने सर्वांना एकत्र बोलवलं. पण, नेमक्या त्या वेळी त्यांना शौल सापडतच नव्हता. का माहीत आहे? कारण तिथे असलेल्या सामानाच्या मागे तो लपून बसला होता. शेवटी त्यांना शौल सापडला. मग, त्यांनी त्याला बाहेर आणलं आणि लोकांच्या मध्ये उभं केलं. शौल सर्वांपेक्षा उंच होता. तो दिसायलाही खूप सुंदर होता. शमुवेल लोकांना म्हणाला: ‘यहोवाने ज्याला निवडलं आहे तो हाच आहे.’ लोकांनी जेव्हा त्याला पाहिलं, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला.

सुरुवातीला शौल राजा, शमुवेलचं ऐकायचा. यहोवा जे काही बोलायचा ते तो करायचा. पण, नंतर तो बदलला. उदाहरणार्थ, बलिदान अर्पण करण्याची परवानगी शौल राजाला नव्हती. एक दिवस जेव्हा बलिदान अर्पण करायचं होतं, तेव्हा शमुवेलने शौलला म्हटलं: ‘मी येईपर्यंत तू थांब.’ पण शमुवेलला यायला थोडा उशीर झाला. तेव्हा शौल त्याच्यासाठी थांबला नाही आणि त्याने स्वतःच बलिदान अर्पण केलं. हे समजल्यावर शमुवेलने काय केलं? तो त्याला म्हणाला: ‘तू यहोवाचा नियम मोडला आहेस. तू असं करायला नको होतं.’ पण, शौल काही सुधरला नाही.

नंतर, शौल अमालेकी लोकांसोबत लढाई करायला गेला. शमुवेलने त्याला सांगितलं होतं, की त्याने सर्व अमालेकी लोकांना मारून टाकलं पाहिजे. पण, शौलने शमुवेलचं ऐकलं नाही. त्याने तिथल्या अगाग राजाला जिवंत ठेवलं. त्यामुळे यहोवाने शमुवेलला म्हटलं: ‘शौल माझं ऐकत नाही. त्याने मला सोडून दिलं आहे.’ हे ऐकून शमुवेलला खूप वाईट वाटलं. तो शौलला म्हणाला: ‘यहोवा जे सांगतो, ते तू आता करत नाहीस. म्हणून तो एक नवीन राजा निवडेल.’ हे सांगून शमुवेल जाण्यासाठी निघाला. तेवढ्यात शौलने शमुवेलचा झगा पकडला आणि तो फाटला. तेव्हा शमुवेल शौलला म्हणाला: ‘यहोवाने तुझ्याकडून तुझं राज्य काढून घेतलं आहे.’ आता यहोवा अशा एका मनुष्याला राज्य देणार होता, ज्याचं त्याच्यावर प्रेम होतं आणि जो त्याचं ऐकणार होता.

“यज्ञापेक्षा [बलिदानापेक्षा] आज्ञा पाळणे बरे.”—१ शमुवेल १५:२२