व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ४०

दावीद आणि गल्याथ

दावीद आणि गल्याथ

यहोवाने शमुवेलला सांगितलं: ‘तू इशायच्या घरी जा. त्याच्या मुलांपैकी एक मुलगा इस्राएलचा नवीन राजा बनेल.’ शमुवेल इशायच्या घरी गेला. त्याने इशायच्या सर्वात मोठ्या मुलाला पाहिलं. त्याच्या मनात असा विचार आला: ‘देवाने याच तरुण मुलाला निवडलं असेल.’ पण यहोवाने शमुवेलला सांगितलं, की हा तो मुलगा नाही. तो शमुवेलला म्हणाला: ‘एक व्यक्‍ती कशी दिसते हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही, तर ती कशा प्रकारची व्यक्‍ती आहे ते जास्त महत्त्वाचं आहे.’

इशायने आपल्या आणखी सहा मुलांना शमुवेलकडे आणलं. पण, शमुवेल म्हणाला: ‘यहोवाने यांच्यापैकी कोणालाच निवडलेलं नाही. तुला आणखीन मुलं आहेत का?’ इशाय म्हणाला: ‘हो. मला आणखीन एक मुलगा आहे. सर्वात लहान. त्याचं नाव दावीद आहे. तो बाहेर मेंढरं सांभाळत आहे.’ जेव्हा दावीद आला तेव्हा यहोवाने शमुवेलला सांगितलं: ‘मी यालाच निवडलं आहे!’ मग, शमुवेलने दावीदच्या डोक्यावर तेल ओतून त्याचा अभिषेक केला. म्हणजे, त्याने त्याला राजा म्हणून नियुक्‍त केलं. तो भविष्यात इस्राएलवर राज्य करणार होता.

काही काळानंतर इस्राएली लोकांची पलिष्टी लोकांसोबत लढाई झाली. पलिष्टी लोकांकडे गल्याथ नावाचा एक खूप उंच आणि धिप्पाड योद्धा होता. तो त्यांच्या बाजूने इस्राएली लोकांविरुद्ध लढणार होता. तो दररोज इस्राएली लोकांना चिडवायचा. तो ओरडून असं म्हणायचा: ‘माझ्यासोबत लढण्यासाठी तुम्ही एका पुरुषाला पाठवा. तो जर जिंकला तर आम्ही तुमचे गुलाम बनू. पण, जर मी जिंकलो तर तुम्ही आमचे गुलाम व्हाल.’

इस्राएली सैनिक जिथे थांबले होते, तिथे एक दिवस दावीद आला. तो त्याच्या भावांसाठी जेवण घेऊन आला होता. त्याचे काही भाऊ सैनिक होते. तिथे त्याने गल्याथचं बोलणं ऐकलं. मग तो म्हणाला: ‘मी लढेन त्याच्यासोबत!’ पण शौल राजा, दावीदला म्हणाला: ‘तू तर एक लहान मुलगा आहेस. तू कसा काय लढशील?’ दावीद म्हणाला: ‘यहोवा मला मदत करेल.’

शौलने लढाईची आपली सर्व शस्त्रं दावीदला दिली. मग दावीदने चिलखत घातलं, तलवार, ढाल आणि बाकीच्या गोष्टी घेऊन पाहिल्या. पण तो शौलला म्हणाला: ‘हे सगळं घेऊन मला लढता येणार नाही.’ मग, दावीदने फक्‍त आपली गोफण घेतली आणि तो निघाला. तो एका झऱ्‍याजवळ गेला. त्याने पाच गुळगुळीत दगड घेतले आणि ते आपल्या पिशवीत ठेवले. त्यानंतर दावीद गल्याथच्या दिशेने धावत गेला. त्याला बघून गल्याथ म्हणाला: ‘ए मुला! ये इकडे. आज मी तुझं मांस पक्ष्यांना आणि जंगली प्राण्यांना खायला देईन.’ गल्याथची धमकी ऐकून दावीद काही घाबरला नाही; तोही ओरडून त्याला असं म्हणाला: ‘तू तर तलवार आणि भाला घेऊन लढण्यासाठी येत आहेस. पण मी यहोवाच्या नावाने तुझ्यासोबत लढायला येत आहे. तू खरंतर आमच्याविरुद्ध नाही, तर देवाविरुद्ध लढत आहेस. यहोवापुढे तलवार आणि भाला हे काहीच नाही. तो किती शक्‍तिशाली आहे, हे आज सर्व लोक पाहतील. तो आज तुम्हा सर्वांना हरवेल आणि आम्हीच जिंकू.’

मग, दावीदने गोफणीत एक दगड ठेवला. त्याने ती गोफण जोरजोरात फिरवली आणि तो दगड गल्याथच्या दिशेने फेकला. यहोवा दावीदला मदत करत असल्यामुळे तो दगड सरळ गल्याथच्या कपाळात घुसला. उंच आणि धिप्पाड गल्याथ धाडकन जमिनीवर पडला आणि मेला! त्यानंतर, पलिष्टी लोक आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागले. खरंच, दावीदचा यहोवावर खूप भरवसा होता. तुझाही त्याच्यासारखाच यहोवावर भरवसा आहे ना?

“माणसांना हे अशक्य आहे, पण देवाला नाही, देवाला सर्वकाही शक्य आहे.”—मार्क १०:२७