व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ४१

दावीद आणि शौल

दावीद आणि शौल

दावीदने गल्याथला मारून टाकल्यानंतर, शौल राजाने दावीदला त्याच्या सैन्याचा अधिकारी बनवलं. दावीदने खूप लढाया जिंकल्या. त्याचं मोठं नाव झालं आणि सगळे त्याला ओळखू लागले. जेव्हा-जेव्हा दावीद लढाईवरून परत यायचा, तेव्हा-तेव्हा स्त्रिया नाचत-गात त्याची स्तुती करायच्या. त्या असं गायच्या: ‘शौलने हजारो लोकांना मारलं. पण दावीदने तर लाखो लोकांना मारलं!’ यामुळे शौल दावीदवर जळू लागला. तो इतका जळू लागला, की त्याला दावीदचा जीव घ्यायचा होता.

दावीद वीणा खूप छान वाजवायचा. एक दिवस दावीद शौलसाठी वीणा वाजवत होता. तेव्हा अचानक शौलने त्याच्या दिशेने भाला फेकला. दावीद लगेच बाजूला झाला आणि तो भाला भिंतीत घुसला. त्यानंतरही, शौलने अनेक वेळा त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न केला. शेवटी, दावीद पळून गेला आणि वाळवंटात जाऊन लपला.

दावीदला मारून टाकण्यासाठी, शौल आपल्या ३,००० सैनिकांना घेऊन त्याला शोधायला निघाला. एक दिवस, तो नेमका त्याच गुहेत गेला, जिथे दावीद आणि त्याचे लोक लपून बसले होते. दावीदसोबत असलेल्यांनी त्याला हळूच म्हटलं: ‘शौलला मारून टाकण्याची हीच चांगली संधी आहे.’ दावीद काहीही आवाज न करता अगदी हळूच शौलकडे गेला. त्याने त्याच्या झग्याचा काठ कापला. पण, शौलला हे समजलंसुद्धा नाही. नंतर मात्र दावीदला खूप वाईट वाटलं. कारण, असं करून त्याने यहोवाच्या अभिषिक्‍त राजाचा अनादर केला होता. दावीदने आपल्या लोकांना शौलवर हल्ला करू दिला नाही. मग, शौल गुहेतून निघून गेला. तेव्हा दावीदने शौलला हाक मारली. त्याने सांगितलं की त्याच्याकडे चांगली संधी असूनही त्याने त्याला मारलं नाही. पण यानंतर शौल बदलला का? दावीदवरचा त्याचा राग कमी झाला का?

नाही. शौल नंतरही दावीदचा जीव घेण्यासाठी त्याला शोधत राहिला. शौल आणि त्याच्या सैनिकांनी एकदा मुक्काम करण्यासाठी एका ठिकाणी तंबू बांधले. तेव्हा रात्रीच्या वेळी दावीद आणि त्याचा भाचा अबीशय, हळूच त्यांच्या तंबूंजवळ गेले. तेव्हा, त्यांनी पाहिलं की शौल झोपला आहे. इतकंच काय, तर त्याचं रक्षण करणारा अबनेर हासुद्धा झोपला होता. अबीशय दावीदला म्हणाला: ‘हीच चांगली संधी आहे. तुम्ही फक्‍त हो म्हणा. मी शौलला इथेच मारून टाकतो.’ दावीद त्याला म्हणाला: ‘नको. यहोवाच शौलचा न्याय करेल. आपण फक्‍त त्याचा भाला आणि पाण्याचं भांडं घेऊन जाऊ.’

मग, दावीद जवळ असलेल्या एका डोंगरावर गेला. तिथून शौल आणि त्याच्या सैनिकांचे तंबू दिसत होते. तिथून दावीद ओरडून म्हणाला: ‘अबनेर, तू तुझ्या राजाचं रक्षण का केलं नाहीस? शौलचा भाला आणि त्याचं पाण्याचं भांडं कुठे आहे?’ शौलने दावीदचा आवाज ओळखला आणि तो म्हणाला: ‘दावीद! तू मला मारू शकला असतास. पण, तू असं केलं नाही. तूच इस्राएलचा पुढचा राजा बनशील हे मला समजलं आहे.’ शौल परत त्याच्या घरी गेला. पण, मग शौलच्या कुटुंबातल्या लोकांबद्दल काय? तेही दावीदचा राग करायचे का? नाही.

“शक्यतो, सर्व माणसांसोबत होईल तितके शांतीने राहा. प्रिय बांधवांनो, सूड घेऊ नका, तर क्रोध व्यक्‍त करणे देवावर सोडून द्या.”—रोमकर १२:१८, १९