व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ४३

दावीद राजाच्या हातून घडलेलं पाप

दावीद राजाच्या हातून घडलेलं पाप

शौल मरून गेल्यानंतर दावीद राजा बनला. तेव्हा तो ३० वर्षांचा होता. राजा बनल्याच्या काही वर्षांनंतर, एकदा संध्याकाळी तो आपल्या महालाच्या छतावर होता. तेव्हा त्याने एका सुंदर स्त्रीला पाहिलं. दावीदने तिची माहिती काढली. त्याला कळलं की तिचं नाव बथशेबा होतं. ती उरीया नावाच्या एका सैनिकाची बायको होती. दावीदने बथशेबाला आपल्या महालात बोलावून घेतलं. त्या दोघांनी एकमेकांसोबत लैंगिक संबंध ठेवले आणि ती गरोदर झाली. दावीदने जे केलं ते त्याने लपवण्याचा प्रयत्न केला. त्याने आपल्या एका अधिकाऱ्‍याला सांगितलं, की लढाईत उरीयाला सर्वात पुढे ठेवून, त्यांनी मागून निघून जावं. मग उरीया लढाईत मरून गेला. त्यानंतर दावीदने बथशेबाशी लग्न केलं.

पण ज्या वाईट गोष्टी घडल्या, त्या सर्व यहोवाने पाहिल्या. मग यहोवाने काय केलं? यहोवाने नाथान संदेष्ट्याला दावीदकडे पाठवलं. नाथान त्याला म्हणाला: ‘एका श्रीमंत माणसाकडे खूप मेंढरं होती आणि एका गरीब माणसाकडे फक्‍त एक छोटीशी मेंढी होती. तिच्यावर त्या गरीब माणसाचं भरपूर प्रेम होतं. पण त्या श्रीमंत माणसाने त्या गरीबाची एकुलती एक मेंढी घेऊन टाकली.’ हे ऐकताच दावीदला खूप राग आला. तो म्हणाला: ‘त्या श्रीमंत माणसाला तर मारूनच टाकलं पाहिजे.’ नाथान दावीदला म्हणाला: ‘तूच आहेस तो श्रीमंत माणूस!’ दावीदला खूप दुःख झालं आणि त्याने आपली चूक कबूल केली. त्याने नाथानला म्हटलं: ‘मी यहोवाविरुद्ध पाप केलं आहे.’ यहोवाने दावीदला शिक्षा केली. या पापामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबाला फार त्रास सहन करावा लागला. पण दावीद नम्र आणि प्रामाणिक असल्यामुळे यहोवाने त्याला जिवंत राहू दिलं.

दावीदला यहोवासाठी मंदिर बांधायचं होतं. पण यहोवाने या कामासाठी त्याच्या मुलाला, म्हणजे शलमोनला निवडलं. त्यामुळे दावीद शलमोनची मदत करण्यासाठी सर्व तयारी करू लागला. दावीद म्हणाला: ‘यहोवाचं मंदिर खूप सुंदर आणि आलिशान असलं पाहिजे. शलमोन अजून लहान आहे. पण मी त्याला तयारी करून देईन आणि त्याची मदत करेन.’ मंदिर बांधण्यासाठी दावीदने स्वतःचे खूपसारे पैसे दिले. त्याने कामात हुशार असणारी माणसं शोधून आणली. त्याने सोनं आणि चांदी जमा केली. तसंच, सोर आणि सीदोन या ठिकाणाहून गंधसरूच्या झाडाची लाकडंही मागवली. जेव्हा दावीद खूप म्हातारा झाला, तेव्हा त्याने शलमोनला मंदिर बांधायचा एक नमुना दिला. दावीद शलमोनला म्हणाला: ‘तुझ्यासाठी ही माहिती लिहून काढायला यहोवाने माझी मदत केली. तो तुझीसुद्धा मदत करेल. घाबरू नकोस. हिंमत धर आणि काम सुरू कर.’

“जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते.” —नीतिसूत्रे २८:१३