व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ४४

यहोवासाठी एक मंदिर

यहोवासाठी एक मंदिर

शलमोन इस्राएलचा राजा बनल्यानंतर यहोवाने त्याला विचारलं: ‘मी तुला काय द्यावं अशी तुझी इच्छा आहे?’ शलमोन म्हणाला: ‘मी अजून लहान आहे. काय करावं आणि कसं वागावं हे मला समजत नाही. कृपा करून मला बुद्धी दे, म्हणजे मी तुझ्या लोकांची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकेन.’ यहोवा म्हणाला: ‘तू माझ्याजवळ बुद्धी मागितली, म्हणून मी तुला पृथ्वीवरचा सर्वात बुद्धिमान व्यक्‍ती बनवेन. पण, त्यासोबतच मी तुला खूप श्रीमंतही बनवेन. आणि जर तू माझं ऐकलं, तर तुझं आयुष्यही खूप मोठं असेल.’

शलमोनने मंदिर बांधायला सुरुवात केली. त्याने सर्वात चांगल्या प्रकारच्या सोन्याचा, चांदीचा, लाकडांचा आणि मौल्यवान रत्नांचा वापर केला. कामात हुशार असलेल्या हजारो पुरुषांनी आणि स्त्रियांनी मंदिर बांधायला मदत केली. सात वर्षांनंतर मंदिर बांधून तयार झालं. आता ते यहोवाला समर्पित करायचं होतं. त्यासाठी तिथे जी वेदी होती तिच्यावर अर्पणं ठेवण्यात आली. मग, शलमोनने वेदीसमोर गुडघे टेकून प्रार्थना केली. तो म्हणाला: ‘यहोवा, तुझ्यासमोर तर हे मंदिर खूप लहान आहे आणि इतकं सुंदरही नाही. पण, तरीसुद्धा तू आमच्या उपासनेचा स्वीकार कर आणि आमच्या प्रार्थना ऐक.’ यहोवाला मंदिराबद्दल आणि शलमोनच्या प्रार्थनेबद्दल कसं वाटलं? शलमोनची प्रार्थना संपली, तेव्हा लगेच यहोवाने आकाशातून आग पाठवली आणि वेदीवर ठेवलेली अर्पणं जळून गेली. असं करून यहोवाने दाखवलं, की त्याला मंदिर आवडलं आहे. इस्राएली लोकांनी जेव्हा हे पाहिलं, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला.

शलमोन खूप बुद्धिमान आहे ही गोष्ट फक्‍त इस्राएली लोकांनाच नाही, तर दूर दूरच्या देशांमध्ये राहणाऱ्‍या लोकांनासुद्धा समजली होती. लोक खूप दुरून शलमोनकडे यायचे आणि आपल्या समस्येसाठी त्याच्याकडे मदत मागायचे. इतकंच काय, तर शबाची राणीसुद्धा शलमोनला भेटायला आली. तिने खूपसारे कठीण प्रश्‍न विचारून त्याची परीक्षा घेतली. शलमोनची उत्तरं ऐकून ती म्हणाली: ‘लोकांनी मला तुझ्याबद्दल जे काही सांगितलं होतं त्यावर माझा विश्‍वास नव्हता. पण आता मला कळलं आहे, की मी ऐकलं होतं त्यापेक्षाही तू जास्त बुद्धिमान आहेस. तुझा देव यहोवा याने खरंच तुला आशीर्वाद दिला आहे.’ इस्राएल देशात लोक खूप सुखाने राहत होते. पण, परिस्थिती लवकरच बदलणार होती.

“पाहा! शलमोनपेक्षा जो महान तो इथे आहे.” —मत्तय १२:४२