व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ४५

राज्याचे दोन भाग होतात

राज्याचे दोन भाग होतात

जोपर्यंत शलमोनने यहोवाची उपासना केली, तोपर्यंत इस्राएल राष्ट्रात शांती होती. पण शलमोनने इतर देशातल्या अनेक स्त्रियांशी लग्न केलं. या स्त्रिया मूर्तिपूजा करायच्या. हळूहळू शलमोन बदलला आणि तोसुद्धा मूर्तिपूजा करू लागला. यहोवाला खूप राग आला. तो शलमोनला म्हणाला: ‘मी इस्राएलवर असलेलं तुझं राज्य तुझ्या कुटुंबापासून काढून घेईन आणि त्याचे दोन भाग होतील. राज्याचा मोठा भाग मी तुझ्या एका सेवकाला देईन आणि तुझं कुटुंब फक्‍त लहान भागावर राज्य करेल.’

यहोवाने जे ठरवलं होतं, ते त्याने आणखीन एका मार्गाने स्पष्ट केलं. यराबाम नावाचा शलमोनचा एक सेवक होता. एकदा रस्त्याने जात असताना तो अहीया संदेष्ट्याला भेटला. अहीया संदेष्ट्याने आपल्या झग्याचे १२ तुकडे केले आणि यराबामला म्हटलं: ‘यहोवा शलमोनच्या कुटुंबाकडून राज्य काढून घेईल आणि त्याचे दोन भाग करेल. हे दहा तुकडे घे, कारण तू इस्राएलच्या दहा वंशांवर राज्य करशील.’ शलमोन राजाला याविषयी कळलं, तेव्हा त्याने यराबामला मारून टाकण्याचं ठरवलं. त्यामुळे यराबाम मिसर देशात पळून गेला. काही काळाने, शलमोन मरून गेला आणि त्याच्या जागी शलमोनचा मुलगा रहबाम राजा झाला. तेव्हा यराबामला वाटलं, की आता इस्राएल देशात परत जाण्यात काहीच धोका नाही.

इस्राएलमधल्या वृद्ध जनांनी रहबामला म्हटलं: ‘जर तू लोकांशी चांगल्या प्रकारे वागलास, तर ते तुला विश्‍वासू राहतील.’ पण रहबामच्या तरुण मित्रांनी त्याला याच्या उलट सल्ला दिला. ते त्याला म्हणाले: ‘लोकांवर दया दाखवण्याची काहीच गरज नाही! उलट, त्यांच्याकडून जास्त काम करून घे!’ रहबामने त्याच्या तरुण मित्रांच्या म्हणण्याप्रमाणे केलं. तो लोकांशी कठोरपणे वागला. म्हणून दहा वंशांच्या राज्याच्या लोकांनी त्याच्याविरुद्ध बंड केलं. त्या लोकांनी यराबामला आपला राजा बनवलं. या दहा वंशांच्या राज्याला इस्राएलचं राज्य म्हणून ओळखलं जाऊ लागलं. बाकीच्या दोन वंशांना यहूदाचं राज्य असं ओळखलं जाऊ लागलं. तिथले लोक रहबामला विश्‍वासू राहिले. अशा रीतीने इस्राएलच्या १२ वंशांचे दोन भाग झाले.

यराबामची इच्छा होती, की लोकांनी उपासना करण्यासाठी यरुशलेमला जाऊ नये. कारण यरुशलेम हे रहबामच्या राज्यात होतं. यराबामला भीती होती, की जर लोक तिथे गेले तर रहबाम त्यांना आपल्याकडे वळवेल आणि ते लोक रहबामला साथ देतील. त्यामुळे यराबामने सोन्याची दोन वासरं बनवून लोकांना असं सांगितलं: ‘यरुशलेम खूप दूर आहे. तुम्ही इथेच उपासना करू शकता.’ त्यामुळे लोक त्या सोन्याच्या वासरांची उपासना करू लागले आणि यहोवाला परत विसरले.

“विश्‍वासात नसलेल्यांसोबत विजोड बंधनात बांधले जाऊ नका. कारण नीती व अनीतीचा काय संबंध? . . . विश्‍वास ठेवणारा आणि विश्‍वासात नसलेला यांच्यात काय संबंध?”—२ करिंथकर ६:१४, १५