व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ४८

एका विधवेचा मुलगा जिवंत होतो

एका विधवेचा मुलगा जिवंत होतो

दुष्काळ असताना यहोवा एलीयाला म्हणाला: ‘सारफथला जा. तिथे एक विधवा तुला खायला अन्‍न देईल.’ शहराच्या दाराजवळ पोचल्यावर एलीयाला एक गरीब विधवा दिसली. ती लाकडं जमा करत होती. त्याने तिच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितलं. ती पाणी आणायला जात असताना, एलीयाने तिला हाक मारून म्हटलं: ‘माझ्यासाठी भाकरीचा तुकडाही घेऊन ये.’ पण ती विधवा म्हणाली: ‘तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे एकही भाकर नाही. फक्‍त मला आणि माझ्या मुलाला पुरेल इतकंच पीठ आणि तेल आहे.’ एलीयाने तिला म्हटलं: ‘जर तू माझ्यासाठी भाकरी बनवलीस, तर दुष्काळ संपेपर्यंत तुझ्याकडचं पीठ आणि तेल संपणार नाही असं यहोवाने वचन दिलं आहे.’

त्यामुळे ती विधवा घरी गेली आणि यहोवाच्या संदेष्ट्यासाठी तिने भाकरी बनवली. यहोवाने जे वचन दिलं होतं तसंच घडलं. दुष्काळ संपेपर्यंत, त्या विधवेला आणि तिच्या मुलाला कधीही उपाशी राहावं लागलं नाही. तिचं पिठाचं आणि तेलाचं भांडं कधीही रिकामं झालं नाही.

मग एक खूप वाईट गोष्ट घडली. त्या विधवेचा मुलगा खूप आजारी पडला आणि मरून गेला. तिने एलीयाकडे मदत मागितली. एलीयाने तिच्या हातातून त्या मुलाला घेतलं आणि वरच्या खोलीत नेलं. त्याने त्या मुलाला एका पलंगावर ठेवलं आणि प्रार्थना केली: ‘यहोवा, दया करून या मुलाला जिवंत कर.’ पण, तुला माहीत आहे का, अजूनपर्यंत असा कोणीही नव्हता जो परत जिवंत झाला होता. शिवाय ती विधवा आणि तिचा मुलगा इस्राएलीही नव्हते. त्यामुळे यहोवाने या मुलाला जिवंत करणं, ही खरंच एक आश्‍चर्याची गोष्ट असणार होती.

यहोवाने त्या मुलाला जिवंत केलं! एलीयाने त्या विधवेला म्हटलं: ‘बघ! तुझा मुलगा जिवंत झाला आहे.’ तिला खूप-खूप आनंद झाला आणि ती एलीयाला म्हणाली: ‘तू खरंच देवाचा माणूस आहेस, हे मला समजलं आहे. कारण तू फक्‍त तेच बोलतोस जे यहोवा तुला सांगतो आणि ते नेहमी खरं ठरतं.’

“कावळ्यांचं उदाहरण घ्या: ते पेरणी किंवा कापणी करत नाहीत; त्यांच्याजवळ धान्याची कोठारे किंवा गोदाम नसतात; तरीसुद्धा देव त्यांना खाऊ घालतो. तुमचं मोल पक्ष्यांपेक्षा जास्त नाही का?”—लूक १२:२४