व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ४९

एका दुष्ट राणीला शिक्षा होते

एका दुष्ट राणीला शिक्षा होते

अहाब राजाचा राजमहाल इज्रेल इथे होता. त्या राजमहालाच्या खिडकीतून एक द्राक्षांचा मळा दिसायचा. तो मळा नाबोथ नावाच्या माणसाचा होता. अहाबला तो मळा हवा होता. त्याने नाबोथकडून तो विकत घेण्याचा प्रयत्नही केला. पण नाबोथ मळा विकायला तयार नव्हता. कारण हा मळा त्याला वारशाने मिळाला होता. आणि वारशाने मिळालेली जागा विकायची नाही, असा देवाचा नियम होता. खरंतर, नाबोथ योग्य तेच करत होता. अहाबनेसुद्धा हे समजून घ्यायला हवं होतं, नाही का? पण याउलट अहाब खूप चिडला. तो इतका रागावला की तो आपल्या खोलीतच बसून राहिला. त्याने जेवायलाही नकार दिला.

अहाबची बायको, ईजबेल राणी ही खूप दुष्ट होती. ती अहाबला म्हणाली: ‘तुम्ही इस्राएलचे राजे आहात. तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला मिळालंच पाहिजे. तुम्ही काळजी करू नका. मळा कसा मिळवायचा ते मी बघते.’ त्यानंतर तिने शहराच्या वडीलजनांना पत्रं पाठवली. नाबोथवर देवाची निंदा करण्याचा खोटा आरोप लावून त्याला दगडांनी मारून टाकावं, असं तिने त्या पत्रांत वडीलजनांना सांगितलं. त्यानंतर त्यांनी ईजबेलच्या म्हणण्यानुसार केलं. मग ईजबेल येऊन अहाबला म्हणाली: ‘नाबोथ जिवंत नाही. तो मळा आता तुमचा आहे.’

पण ईजबेलने फक्‍त नाबोथचाच खून केला नव्हता. तिने यहोवावर प्रेम करणाऱ्‍या अनेक चांगल्या माणसांचा खून केला होता. शिवाय, ती मूर्तींची उपासना करायची आणि इतरही वाईट गोष्टी करायची. पण ईजबेलने केलेली सर्व वाईट कामं यहोवा पाहत होता. मग तो त्याबद्दल काहीच करणार नव्हता का?

अहाब राजाचा मृत्यू झाल्यावर त्याचा मुलगा योराम राजा बनला. ईजबेल आणि तिच्या कुटुंबातल्या लोकांना शिक्षा करण्यासाठी यहोवाने येहू नावाच्या माणसाला निवडलं.

येहू आपला रथ घेऊन ईजबेलकडे इज्रेलला गेला. येहू येत असल्याचं पाहून, योरामही आपला रथ घेऊन त्याला भेटायला गेला. त्याला भेटल्यावर त्याने येहूला विचारलं: ‘येहू, आपल्यात सर्व काही ठीक आहे ना?’ येहूने उत्तर दिलं: ‘तुझी आई ईजबेल ही वाईट कामं करत असताना सर्वकाही ठीक कसं असणार?’ हे ऐकताच योरामने तिथून पळ काढण्यासाठी आपला रथ वळवला. पण येहूने योरामला बाण मारला आणि त्याचा मृत्यू झाला.

त्यानंतर येहू ईजबेलच्या महालाकडे गेला. येहू येत असल्याचं ईजबेलला कळलं, तेव्हा ती सजून तयार झाली आणि वरच्या खिडकीत वाट पाहत बसली. येहू आल्यावर ती त्याच्याशी उद्धटपणे बोलली. मग येहूने तिच्या शेजारी असलेल्या सेवकांना मोठ्याने म्हटलं: ‘तिला खाली फेका!’ त्या सेवकांनी येहूचं ऐकलं आणि ईजबेलला खिडकीतून बाहेर ढकलून दिलं. ती खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला.

त्यानंतर, येहूने अहाबच्या ७० मुलांना मारून टाकलं. देशात चाललेली बआल देवाची उपासना त्याने पूर्णपणे काढून टाकली. या गोष्टीतून आपण काय शिकतो? हेच की यहोवाला सर्वकाही माहीत असतं आणि योग्य वेळ आल्यावर तो वाईट कामं करणाऱ्‍यांना शिक्षा करतो.

“पैशाचे प्रेम हे सर्व वाईट गोष्टींचे मूळ आहे.”—१ तीमथ्य ६:१०