व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ५१

योद्धा आणि एक लहान मुलगी

योद्धा आणि एक लहान मुलगी

एक इस्राएली मुलगी अराम देशात राहायची. ती आपल्या घरापासून खूप लांब होती. अरामच्या सैन्याने तिला तिच्या कुटुंबापासून दूर, अराम देशात आणलं होतं. ती नामान नावाच्या एका सेनापतीच्या बायकोची दासी होती. तिथले लोक यहोवाचे उपासक नव्हते. असं असलं, तरी ती लहान मुलगी यहोवाची उपासना करायची.

नामानला त्वचेचा एक भयंकर रोग झाला होता. त्यामुळे त्याला नेहमी वेदना व्हायच्या. त्या लहान मुलीला त्याची मदत करण्याची मनापासून इच्छा होती. म्हणून तिने नामानच्या पत्नीला म्हटलं: ‘मला माहीत आहे, की तुमच्या पतीला कोण बरं करू शकतं. त्याचं नाव अलीशा आहे आणि तो यहोवाचा एक संदेष्टा आहे. तो इस्राएलमध्ये राहतो. तो तुमच्या पतीला नक्की बरं करेल.’

लहान मुलीने जे म्हटलं ते नामानच्या बायकोने नामानला सांगितलं. त्याला बरं व्हायचं होतं. त्यामुळे तो काहीही करायला तयार होता. आणि म्हणूनच तो अलीशाला भेटायला इस्राएलमध्ये त्याच्या घरी गेला. नामानला वाटलं, की मी एक मोठा माणूस आहे म्हणून अलीशा मला भेटायला बाहेर येईल. पण अलीशाने स्वतः त्याच्याशी बोलण्याऐवजी एका सेवकाला पाठवलं. आणि असा संदेशसुद्धा दिला: ‘यार्देन नदीत जाऊन सात वेळा डुबकी मार. तुझा आजार बरा होईल.’

नामानला हे ऐकून फार वाईट वाटलं. त्याने म्हटलं: ‘मला वाटलं हा संदेष्टा देवाला हाक मारेल आणि माझ्यावर हात फिरवून मला बरं करेल. पण याने तर मला इस्राएलमधल्या एका नदीत जायला सांगितलं. आमच्या अराममध्ये यापेक्षाही चांगल्या नद्या आहेत. मग मी तिथेच गेलो नसतो का?’ नामानला राग आला आणि तो तिथून निघून गेला.

पण नामानच्या सेवकांनी त्याची समजूत काढली. त्यांनी नामानला म्हटलं: ‘तुम्ही बरं होण्यासाठी काहीही करायला तयार होता ना? मग या संदेष्ट्याने तर तुम्हाला फक्‍त एक साधीशी गोष्ट करायला सांगितली आहे. ती करून बघायला काय हरकत आहे?’ त्यांनी सांगितलेली गोष्ट नामानला पटली. त्याने यार्देन नदीत जाऊन सात वेळा डुबकी मारली. सातव्या डुबकीनंतर जेव्हा नामान पाण्यातून बाहेर आला तेव्हा पाहतो तर काय, तो पूर्णपणे बरा झाला होता! त्याला अलीशाचे आभार मानायचे होते म्हणून तो अलीशाकडे गेला. नामान त्याला म्हणाला: ‘यहोवाच खरा देव आहे हे मला समजलं आहे.’ नामान घरी गेल्यावर जेव्हा त्या लहान इस्राएली मुलीने त्याला पाहिलं असेल, तेव्हा तिला कसं वाटलं असेल? तुला काय वाटतं?

“तू लहान मुलांना व तान्ह्या बाळांना आपल्या मुखाने स्तुती करायला लावलं आहेस.” —मत्तय २१:१६