व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ५३

यहोयादाने धैर्य दाखवलं

यहोयादाने धैर्य दाखवलं

ईजबेल राणीला एक मुलगी होती. तिचं नाव होतं अथल्या. ती तिच्या आईप्रमाणेच दुष्ट होती. अथल्या राणीचं लग्न यहूदाच्या राजाशी झालं. जेव्हा तिच्या पतीचा मृत्यू झाला, तेव्हा तिचा मुलगा राजा बनला. पण तिच्या मुलाचासुद्धा मृत्यू झाला. मग ती स्वतः यहूदावर राज्य करू लागली. त्यानंतर ती अशा सर्वांना मारून टाकायची, जे तिची जागा घेऊ शकत होते. इतकंच काय, तर तिने आपल्या नातवंडांनासुद्धा सोडलं नाही. राजघराण्यातल्या सर्व मुलांना मारून टाकण्याचा तिने प्रयत्न केला. यामुळे सगळेच तिला घाबरायचे.

अथल्या चुकीची कामं करत आहे हे महायाजक यहोयादा आणि त्याची पत्नी यहोशेबा यांना माहीत होतं. त्यामुळे त्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता, अथल्या राणीच्या एका नातवाला लपवलं. त्याचं नाव यहोआश होतं. त्या वेळी यहोआश लहान बाळ होता. त्यांनी त्याला मंदिरात वाढवलं.

जेव्हा यहोआश सात वर्षांचा झाला, तेव्हा यहोयादाने सर्व सरदारांना आणि लेवींना बोलवून म्हटलं: ‘मंदिराच्या दारावर पहारा द्या आणि कोणालाही आत येऊ देऊ नका.’ मग यहोयादाने यहोआशला मुकुट घातला आणि त्याला यहूदाचा राजा बनवलं. यहूदाच्या लोकांना आनंद झाला आणि ते मोठ्या आवाजात म्हणाले: ‘राजा खूप-खूप वर्षं जगो!’

अथल्या राणीने लोकांचा आवाज ऐकला आणि ती लगेच मंदिराकडे गेली. तिने जेव्हा नवीन राजाला पाहिलं, तेव्हा ती ओरडून म्हणाली: ‘विश्‍वासघात! विश्‍वासघात!’ मग सरदारांनी त्या दुष्ट राणीला पकडून नेलं आणि तिला मारून टाकलं. पण देशातल्या सर्व लोकांवर तिचा जो वाईट प्रभाव पडला होता, त्याबद्दल काय?

यहोयादाने देशातल्या सर्व लोकांना यहोवासोबत एक करार करायला मदत केली. त्यांनी वचन दिलं की ते फक्‍त यहोवाचीच उपासना करतील. यहोयादाने लोकांना बआल देवाच्या मंदिराचा आणि मूर्तींचा नाश करायला सांगितलं. त्याने मंदिरात सेवा करण्यासाठी याजक आणि लेवी नेमले. यामुळे लोक मंदिरात पुन्हा उपासना करू शकत होते. तसंच, मंदिरात कोणी अशुद्ध व्यक्‍ती येऊ नये, म्हणून त्याने मंदिराच्या दारावर रक्षण करणाऱ्‍यांनासुद्धा नेमलं. त्यानंतर यहोयादा आणि सरदारांनी यहोआशला महालात नेलं आणि त्याला राजपद दिलं. यहूदाच्या लोकांना खूप आनंद झाला. दुष्ट अथल्या राणीपासून आणि बआल देवाच्या उपासनेपासून, यहूदाचे लोक शेवटी मुक्‍त झाले होते. ते आता यहोवाची उपासना करू शकत होते. यहोयादाने धैर्य दाखवल्यामुळे बऱ्‍याच लोकांना मदत झाली, नाही का?

“जे शरीर नष्ट करतात, पण जीवन नष्ट करू शकत नाहीत त्यांना भिऊ नका; तर जो गेहेन्‍नात जीवन आणि शरीर दोन्ही नष्ट करू शकतो त्याचं भय बाळगा.”—मत्तय १०:२८