व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ५७

यहोवा यिर्मयाला प्रचार करायला पाठवतो

यहोवा यिर्मयाला प्रचार करायला पाठवतो

यहोवाने यिर्मयाला संदेष्टा म्हणून निवडलं. त्याने त्याला यहूदाच्या लोकांना प्रचार करायला सांगितलं. त्यांनी आपली वाईट कामं सोडून द्यावीत अशी चेतावणी त्याला लोकांना द्यायची होती. पण यिर्मया यहोवाला म्हणाला: ‘यहोवा, मी तर लहान आहे. आणि लोकांशी कसं बोलावं हेसुद्धा मला माहीत नाही.’ यावर यहोवाने त्याला म्हटलं: ‘घाबरू नकोस. मी तुला मदत करेन. काय बोलायचं, ते मी तुला सांगेन.’

यहोवाने यिर्मयाला शहरातल्या प्रमुख पुरुषांना जमा करायला सांगितलं. मग त्यांच्यासमोर मातीचं एक मडकं फोडून असं बोलायला सांगितलं: ‘या मडक्याप्रमाणेच यरुशलेमचासुद्धा नाश केला जाईल.’ यहोवाने जसं सांगितलं तसं यिर्मयाने केलं. त्यामुळे त्या प्रमुखांना खूप राग आला. पशहूर नावाच्या एका याजकाने तर यिर्मयाला फटके मारले आणि त्याचे हात-पाय लाकडाच्या फळ्यांमध्ये रात्रभर अडकवून ठेवले. यामुळे यिर्मया काहीच हालचाल करू शकला नाही. दुसऱ्‍या दिवशी सकाळी पशहूरने त्याला सोडलं. यानंतर यिर्मयाने असा विचार केला: ‘मी इथून पुढे प्रचार करणार नाही. मी हे सर्व आणखीन सहन करू शकत नाही.’ त्याने प्रचार करणं खरंच बंद केलं का? नाही. कारण जेव्हा यिर्मयाने या गोष्टीवर आणखीन थोडा विचार केला, तेव्हा तो म्हणाला: ‘यहोवाचा संदेश माझ्यामध्ये एका आगीसारखा आहे. म्हणून मी प्रचार करणं बंद करूच शकत नाही.’ यिर्मयाने लोकांना चेतावणी देण्याचं आपलं काम चालूच ठेवलं.

यानंतर खूप वर्षं उलटून गेली. यहूदामध्ये एक नवीन राजा राज्य करू लागला. यिर्मयाचा संदेश ऐकून याजकांना आणि खोट्या संदेष्ट्यांना त्याचा राग यायचा. म्हणून त्यांनी राजकुमारांना म्हटलं: ‘या माणसाला तर मारूनच टाकलं पाहिजे.’ पण यिर्मया त्यांना म्हणाला: ‘मला मारून खरंतर तुम्ही एका निर्दोष व्यक्‍तीचा खून कराल. कारण मी जो संदेश सांगत आहे, तो माझा नाही तर यहोवाचा आहे.’ हे ऐकल्यावर, राजकुमार म्हणाले: ‘या माणसाला सोडून द्या, त्याचा जीव घेऊ नका.’

यिर्मयाने प्रचार करायचं थांबवलं नाही. यामुळे राजकुमारांना खूप राग आला. यिर्मयाला मारून टाका असं त्यांनी राजाला सांगितलं. राजाने यिर्मयाला त्यांच्याकडे सोपवून म्हटलं, की तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. मग त्या राजकुमारांनी यिर्मयाला चिखल असलेल्या एका खोल विहिरीत टाकलं. यिर्मया चिखलात बुडू लागला. राजकुमारांना वाटलं की तो मरून जाईल.

मग एबद-मलेख नावाच्या एका अधिकाऱ्‍याने राजाला म्हटलं: ‘राजकुमारांनी यिर्मयाला विहिरीत टाकलं आहे! जर त्याला बाहेर काढलं नाही, तर तो मरून जाईल.’ राजाने यिर्मयाला विहिरीतून बाहेर काढण्याची आज्ञा एबद-मलेखला दिली. त्याने त्याला ३० माणसांना सोबत घेऊन जाण्यासाठीही सांगितलं. खरंच, कोणतीही गोष्ट यिर्मयाला प्रचार करण्यापासून थांबवू शकली नाही. आपणसुद्धा यिर्मयासारखंच असलं पाहिजे, नाही का?

“माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील, पण जो शेवटपर्यंत धीर धरेल, त्यालाच वाचवलं जाईल.”—मत्तय १०:२२