व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ५८

यरुशलेमचा नाश होतो

यरुशलेमचा नाश होतो

यहूदाचे लोक सतत यहोवाला सोडून खोट्या देवांची उपासना करायचे. त्यांनी सुधरावं म्हणून कित्येक वर्षं यहोवाने त्यांची मदत केली. लोकांना चेतावणी देण्यासाठी त्याने बऱ्‍याच संदेष्ट्यांना पाठवलं. पण त्यांनी ऐकलं नाही. याउलट त्यांनी संदेष्ट्यांची थट्टा केली. मग ते करत असलेली वाईट कामं आणि मूर्तिपूजा थांबवण्यासाठी यहोवाने काय केलं?

बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर एका नंतर एक राष्ट्र जिंकत गेला. नबुखद्‌नेस्सरने जेव्हा पहिल्यांदा यरुशलेमवर विजय मिळवला, तेव्हा त्याने यरुशलेमचा राजा यहोयाखीन याला पकडून बाबेलमध्ये नेलं. त्यासोबत त्याने तिथल्या राजकुमारांना, योद्ध्‌यांना आणि कारागिरांनाही नेलं. त्याने यहोवाच्या मंदिरातला सर्व खजिनासुद्धा नेला. त्यानंतर नबुखद्‌नेस्सर राजाने सिद्‌कीयाला यहूदाचा राजा बनवलं.

सिद्‌कीया राजा सुरुवातीला नबुखद्‌नेस्सरचं ऐकायचा. पण आसपासच्या राष्ट्रांनी आणि खोट्या संदेष्ट्यांनी त्याला बाबेलच्या विरोधात जायला सांगितलं. यामुळे यिर्मयाने सिद्‌कीयाला चेतावणी दिली: ‘जर तू राजाचं ऐकलं नाहीस तर यहूदातल्या लोकांना मारून टाकलं जाईल, दुष्काळ पडेल आणि आजारपण येईल.’

आठ वर्षं राज्य केल्यानंतर सिद्‌कीयाने बाबेलचा विरोध करण्याचं ठरवलं. त्याने मिसर देशाच्या सैन्याकडून मदत मागितली. हे समजल्यावर नबुखद्‌नेस्सरने यरुशलेमवर हल्ला करण्यासाठी आपले सैनिक पाठवले. सैनिकांनी शहराच्या बाहेर आपले तंबू बांधले. यिर्मयाने सिद्‌कीयाला म्हटलं: ‘यहोवा म्हणतो, की जर तू बाबेलच्या राजाचं ऐकलं आणि हार मानली तर तू आणि हे शहर वाचेल. पण जर का तू ऐकलं नाहीस, तर बाबेलचे लोक यरुशलेम जाळून टाकतील आणि तुला नेऊन जेलमध्ये बंद करतील.’ यावर सिद्‌कीया म्हणाला: ‘मी हार मानणार नाही!’

दीड वर्षांनंतर, बाबेलचे सैनिक यरुशलेमच्या भिंती पाडून शहरात शिरले. त्यांनी शहर आणि मंदिर जाळून टाकलं. सैनिकांनी खूप लोकांना मारून टाकलं. तसंच, हजारो लोकांना पकडून नेलं आणि जेलमध्ये टाकलं.

सिद्‌कीया यरुशलेममधून पळून गेला. पण बाबेलच्या लोकांनी त्याचा पाठलाग केला. त्यांनी त्याला यरीहो शहराजवळ पकडलं आणि नबुखद्‌नेस्सरकडे आणलं. बाबेलच्या राजाने सिद्‌कीयाच्या मुलांना त्याच्या समोरच मारून टाकलं. त्यानंतर त्याला आंधळा करून जेलमध्ये टाकून दिलं. शेवटी सिद्‌कीया तिथेच मरून गेला. पण यहूदाच्या लोकांना यहोवाने असं वचन दिलं: ‘मी तुम्हाला ७० वर्षांनंतर तुमच्या घरी म्हणजे यरुशलेममध्ये परत आणेन.’

मग ज्या तरुणांना बाबेलमध्ये नेण्यात आलं होतं त्यांचं काय झालं? ते यहोवाला विश्‍वासू राहिले का?

“हे सर्वसमर्थ यहोवा देवा, खरंच, तुझे निर्णय खरे व न्यायाला धरून आहेत.”—प्रकटीकरण १६:७