व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ६२

मोठ्या झाडासारखं एक राज्य

मोठ्या झाडासारखं एक राज्य

एका रात्री नबुखद्‌नेस्सरला खूप भयानक स्वप्न पडलं. त्याचा अर्थ समजावून सांगण्यासाठी त्याने बुद्धिमान पुरुषांना बोलवलं. पण, स्वप्नाचा अर्थ कोणीही सांगू शकलं नाही. शेवटी राजाने दानीएलला बोलवलं.

नबुखद्‌नेस्सरने दानीएलला सांगितलं: ‘माझ्या स्वप्नात मी एक झाड पाहिलं. ते खूप मोठं होत गेलं. इतकं, की ते आकाशापर्यंत पोचलं. पृथ्वीवर कुठूनही ते झाड दिसायचं. त्या झाडाला हिरवीगार पानं आणि खूपसारी फळं होती. त्याच्या सावलीत प्राणी आराम करायचे आणि पक्षी त्याच्या फांद्यांवर घरटी बनवायचे. मग तिथे एक देवदूत आला. तो मोठ्याने म्हणाला: “हे झाड आणि त्याच्या फांद्या कापून टाका. पण, त्याचा बुंधा आणि त्याची मुळं तशीच जमिनीत राहू द्या. त्याच्या बुंध्याला लोखंडाच्या आणि तांब्याच्या पट्ट्या बांधा. मग, मानवाच्या मनासारखं असलेलं त्या झाडाचं मन प्राण्याच्या मनासारखं होईल. आणि सात काळ ते तसंच राहील. तेव्हा सर्व लोकांना कळेल, की देवच खरा शासक आहे आणि तो कोणालाही राजा बनवू शकतो.”’

यहोवाने दानीएलला या स्वप्नाचा अर्थ सांगितला. दानीएलला जेव्हा स्वप्नाचा अर्थ समजला, तेव्हा तोही घाबरला. तो राजाला म्हणाला: ‘महाराज, हे स्वप्न तुमच्या शत्रूंबद्दल असतं तर बरं झालं असतं. पण, हे स्वप्न तुमच्याबद्दल आहे. जे मोठं झाड कापलं गेलं ते झाड तुम्हीच आहात. याचा अर्थ तुम्ही तुमचं राज्य गमवाल. जंगलातल्या एका प्राण्यासारखं तुम्ही गवत खाल. पण, झाडाचा बुंधा आणि त्याची मुळं तशीच राहतील असंही देवदूत म्हणाला. याचा अर्थ तुम्ही पुन्हा राजा बनाल.’

याच्या एका वर्षानंतर, एकदा नबुखद्‌नेस्सर आपल्या राजवाड्याच्या गच्चीवर फेरी मारत होता. तेव्हा बाबेल शहर पाहून त्याने म्हटलं: ‘वा! काय सुंदर शहर बनवलं मी. खरंच किती महान आहे मी.’ त्याचं बोलणं संपण्याच्या आतच आकाशातून एक आवाज आला: ‘नबुखद्‌नेस्सर! तुझ्या हातून तू तुझं राज्य गमवलं आहेस.’

त्याच क्षणी नबुखद्‌नेस्सर वेडा झाला आणि एका जंगली प्राण्यासारखं वागू लागला. त्याला आपलं राजमहाल सोडावं लागलं आणि जंगली प्राण्यांसोबत राहावं लागलं. नबुखद्‌नेस्सरचे केस गरुडाच्या पिसांप्रमाणे वाढले. त्याची नखंसुद्धा पक्ष्यांच्या नखांप्रमाणे वाढली.

सात वर्षं संपल्यानंतर नबुखद्‌नेस्सर बरा झाला. यहोवाने त्याला पुन्हा बाबेलचा राजा बनवलं. तेव्हा नबुखद्‌नेस्सर म्हणाला: ‘स्वर्गाचा राजा यहोवा याची मी महिमा करतो. आता मला समजलं आहे, की यहोवाच खरा शासक आहे. तो गर्विष्ठ लोकांना शिक्षा करतो. तसंच तो हवं त्याला राज्य देऊ शकतो.’

“नाशाच्या आधी गर्व आणि पतनाच्या आधी अहंकारी आत्मा असतो.” —नीतिसूत्रे १६:१८, पं.र.भा.