व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ६४

सिंहांच्या गुहेत दानीएल!

सिंहांच्या गुहेत दानीएल!

बाबेलचा आणखीन एक राजा म्हणजे दारयावेश. तो एक मेदी होता. त्याने पाहिलं की दानीएलमध्ये दुसऱ्‍यांपेक्षा जास्त कौशल्यं आहेत. त्यामुळे त्याने दानीएलला देशातल्या सर्व महत्त्वपूर्ण लोकांवर अधिकारी नेमलं. यामुळे ते लोक दानीएलवर जळू लागले. त्यांना कसंही करून दानीएलला मारून टाकायचं होतं. दानीएल दिवसातून तीन वेळा यहोवाला प्रार्थना करतो, ही गोष्ट त्यांना माहीत होती. म्हणून त्यांनी दारयावेश राजाला म्हटलं: ‘हे राजा, सर्व लोकांनी फक्‍त तुलाच प्रार्थना केली पाहिजे, असा एक कायदा असायला हवा. आणि जो कोणी हा कायदा मोडेल त्याला सिंहांच्या गुहेत टाकण्यात यावं.’ दारयावेशला ही कल्पना आवडली. आणि त्याने सही करून या कायद्याला मान्य केलं.

या नवीन कायद्याबद्दल दानीएलला कळलं, तेव्हा तो लगेच त्याच्या घरी गेला. एका उघड्या खिडकीसमोर गुडघे टेकून तो यहोवाला प्रार्थना करू लागला. तेवढ्यात दानीएलवर जळणारी ती माणसं, त्याच्या घरात घुसली. त्यांनी त्याला प्रार्थना करताना पाहिलं. तेव्हा ती दारयावेश राजाकडे जाऊन म्हणाली: ‘दानीएल तर तुमचा कायदा मोडत आहे. तो दिवसातून तीन वेळा त्याच्या देवाला प्रार्थना करतो.’ खरंतर दारयावेश राजाला दानीएल आवडायचा. दानीएलला शिक्षा व्हावी आणि त्याने मरावं अशी त्याची इच्छा नव्हती. त्यामुळे दानीएलला कसं वाचवता येईल, याबद्दल तो दिवसभर विचार करत होता. पण, राजाने जर एखादा कायदा मान्य केला असेल, तर तो स्वतःसुद्धा तो कायदा बदलू शकत नव्हता. म्हणून दानीएलला सिंहांच्या गुहेत टाकण्याची आज्ञा दारयावेशला द्यावीच लागली.

त्या रात्री दारयावेशला दानीएलची एवढी चिंता लागली होती, की तो रात्रभर झोपू शकला नाही. सकाळ होताच तो गुहेकडे पळत गेला आणि त्याने मोठ्याने हाक मारली: ‘दानीएल, तुझ्या देवाने तुला वाचवलं का?’

मग दारयावेशला गुहेतून एक आवाज ऐकू आला. तो आवाज दानीएलचा होता! दानीएल दारयावेशला म्हणाला: ‘सिंहांनी मला काहीही केलं नाही. कारण, यहोवाच्या देवदूताने सिंहांची तोंडं बंद केली होती.’ हे ऐकून दारयावेश खूप खूश झाला! त्याने दानीएलला गुहेतून लगेच बाहेर काढण्याची आज्ञा दिली. दानीएल अगदी सुरक्षित होता. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, सिंहांनी दानीएलला नखसुद्धा लावलं नव्हतं. मग राजाने आज्ञा दिली: ‘ज्या लोकांनी दानीएलवर आरोप लावला, त्यांनाच सिंहांच्या गुहेत टाकून द्या.’ त्या माणसांना गुहेत टाकताच, सिंहांनी त्यांना खाऊन टाकलं.

यानंतर दारयावेशने त्याच्या लोकांना अशी आज्ञा दिली: ‘सर्वांनी दानीएलच्या देवाचा आदर करावा आणि त्याच्या देवाचं भय बाळगावं. कारण, त्याने दानीएलला सिंहांपासून वाचवलं आहे.’

दानीएलसारखी तुलाही दररोज यहोवाला प्रार्थना करण्याची सवय आहे का?

“सुभक्‍तीने जीवन जगणाऱ्‍या लोकांची परीक्षेतून सुटका कशी करावी . . . हे यहोवाला माहीत आहे.”—२ पेत्र २:९