व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ६६

एज्राने लोकांना देवाचे नियम शिकवले

एज्राने लोकांना देवाचे नियम शिकवले

इस्राएली लोकांना यरुशलेमला परत जाऊन जवळजवळ ७० वर्षं झाली होती. पण, अजूनही काही इस्राएली लोक पारसच्या साम्राज्यात राहत होते. त्यांपैकी एक होता एज्रा. तो एक याजक होता आणि लोकांना देवाचे नियम शिकवायचा. एज्राला कळलं, की यरुशलेममध्ये राहणारे लोक देवाच्या नियमांप्रमाणे वागत नव्हते. म्हणून त्याला यरुशलेमला जाऊन त्यांची मदत करण्याची इच्छा होती. पारसच्या अर्तहशश्‍त राजाने एज्राला म्हटलं: ‘तू देवाचे नियम इतरांना शिकवावे यासाठीच त्याने तुला बुद्धिमान बनवलं आहे. तर मग यरुशलेमला जा. आणि ज्याला कोणाला तुझ्यासोबत यायची इच्छा आहे त्यालाही घेऊन जा.’ ज्यांना यरुशलेमला पुन्हा जाण्याची इच्छा होती त्या सर्वांना एज्रा भेटला. यरुशलेमचा प्रवास खूप लांबचा होता. म्हणून प्रवासात यहोवाने त्यांचं रक्षण करावं, यासाठी त्यांनी यहोवाला प्रार्थना केली. त्यानंतर ते यरुशलेमला जायला निघाले.

चार महिन्यांनंतर ते यरुशलेमला पोचले. तिथे पोचल्यावर तिथल्या राजकुमारांनी एज्राला सांगितलं: ‘इस्राएली लोकांनी खोट्या देवांची उपासना करणाऱ्‍या स्त्रियांशी लग्न केली आहेत. त्यांनी देवाची आज्ञा मोडली आहे.’ हे ऐकल्यानंतर एज्राने काय केलं? त्याने गुडघे टेकून सर्व लोकांसमोर यहोवाला अशी प्रार्थना केली: ‘हे यहोवा, तू आमच्यासाठी खूपकाही केलं आहेस. तरीसुद्धा आम्ही तुझ्याविरुद्ध पाप केलं.’ हे ऐकून लोकांना आपली चूक लक्षात आली. त्यांनी यहोवाजवळ माफी मागितली. पण योग्य गोष्टी करण्यासाठी त्यांना मदतीची गरज होती. यासाठी एज्राने प्रमुखांना आणि न्यायाधीशांना नेमलं. ते लोकांची मदत करणार होते. मग पुढच्या तीन महिन्यांत अशा सर्व लोकांना शहराबाहेर काढण्यात आलं, जे यहोवाची उपासना करत नव्हते.

यानंतर बारा वर्षं गेली. यरुशलेमच्या पडलेल्या भिंतीही या काळात बांधण्यात आल्या. मग, एज्राने सर्व लोकांना एका सार्वजनिक ठिकाणी एकत्र यायला सांगितलं. त्याने लोकांना देवाचे नियम वाचून दाखवले. एज्राने जेव्हा नियमांचं पुस्तक उघडलं, तेव्हा लोक उठून उभे राहिले. एज्राने यहोवाची स्तुती केली. लोकांनीही आपले हात वर करून ते एज्राशी सहमत असल्याचं दाखवलं. मग एज्राने नियम वाचून दाखवले आणि त्यांचा अर्थसुद्धा समजावून सांगितला. लोकांनी लक्ष देऊन ऐकलं. ते यहोवापासून पुन्हा दूर गेले होते ही गोष्ट त्यांनी मान्य केली. त्यांना खूप दुःख झालं आणि ते रडले. दुसऱ्‍या दिवशी, एज्राने त्यांना आणखीन काही नियम वाचून दाखवले. त्यांच्या लक्षात आलं, की त्यांनी लवकरात लवकर मंडपांचा सण साजरा केला पाहिजे. त्यामुळे ते लगेच सणाच्या तयारीला लागले.

लोकांनी हा सण सात दिवस साजरा केला. त्यांनी खूप आनंद केला आणि शेतात चांगलं पीक आल्याबद्दल यहोवाचे आभार मानले. यहोशवाच्या दिवसांपासून अशा प्रकारचा मंडपांचा सण, आतापर्यंत साजरा करण्यात आला नव्हता. या सणानंतर लोक एकत्र आले आणि त्यांनी यहोवाला अशी प्रार्थना केली: ‘हे यहोवा, तू आम्हाला गुलामीतून सोडवलं, वाळवंटात असताना खाण्यासाठी अन्‍न पुरवलं आणि इतका सुंदर देशही दिला. पण, आम्ही पुन्हापुन्हा तुझ्या आज्ञा मोडल्या. तू आम्हाला चेतावणी देण्यासाठी तुझे संदेष्टे पाठवले. पण, आम्ही त्यांचं ऐकलं नाही. तरीही तू आमच्यासोबत सहनशीलतेने वागलास. अब्राहामला दिलेलं वचन तू पाळलंस. आज आम्ही तुला एक वचन देतो, की आम्हीसुद्धा तुझ्या आज्ञा पाळू.’ मग त्या लोकांनी ते वचन लिहून काढलं. आणि राजकुमारांनी, लेव्यांनी व याजकांनी त्यावर शिक्का मारला.

“जे देवाचं वचन ऐकून त्याप्रमाणे वागतात तेच सुखी!” —लूक ११:२८