व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ६८

अलीशिबाला बाळ होतं

अलीशिबाला बाळ होतं

यरुशलेमच्या भिंती पुन्हा बांधून आता ४०० वर्षं झाली होती. यरुशलेम शहराजवळ जखऱ्‍या नावाचा एक याजक राहायचा. त्याच्या बायकोचं नाव होतं अलीशिबा. त्यांच्या लग्नाला खूप वर्षं झाली होती. पण त्यांना मूलबाळ नव्हतं. एक दिवस जेव्हा जखऱ्‍या धूप अर्पण करण्यासाठी मंदिराच्या पवित्रस्थानात गेला, तेव्हा गब्रीएल नावाचा देवदूत तिथे आला. त्याला पाहून जखऱ्‍या खूप घाबरला. पण गब्रीएल त्याला म्हणाला: ‘घाबरू नकोस. मी यहोवाकडून तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. अलीशिबाला एक मुलगा होईल. त्याचं नाव योहान ठेव. यहोवाने एका खास कामासाठी योहानला निवडलं आहे.’ जखऱ्‍याने त्या देवदूताला म्हटलं: ‘मी आणि माझी बायको तर खूप म्हातारे झालो आहोत. आम्हाला मूल होणं शक्यच नाही. मग मी या गोष्टीवर विश्‍वास कसा ठेवू?’ गब्रीएल म्हणाला: ‘ही बातमी सांगण्यासाठी मला देवाने पाठवलं आहे. पण तू माझ्यावर विश्‍वास ठेवला नाहीस. म्हणून आता तू मुका होशील. तुझ्या बाळाचा जन्म होईपर्यंत तुला बोलता येणार नाही.’

जखऱ्‍याला पवित्रस्थानातून बाहेर यायला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागला. तो जसा बाहेर आला, तसं लोकांनी त्याला आत काय घडलं याविषयी विचारलं. पण जखऱ्‍या काहीच बोलू शकला नाही. तो फक्‍त हातांनी खुणा करत होता. तेव्हा लोकांना समजलं, की जखऱ्‍याला देवाकडून एक संदेश मिळाला आहे.

काही काळाने अलीशिबा गरोदर राहिली. देवदूताने म्हटल्याप्रमाणे तिला एक मुलगा झाला. तिचे नातेवाईक आणि मित्रमंडळी तिच्या बाळाला पाहायला आले. अलीशिबाला मूल झाल्यामुळे त्यांना फार आनंद झाला. अलीशिबा म्हणाली: ‘या बाळाचं नाव योहान ठेवू.’ पण लोक म्हणाले: ‘तुमच्या नातेवाइकांपैकी कोणाचंही नाव योहान नाही. म्हणून आपण बाळाचं नाव त्याच्या वडिलांच्या नावावर, म्हणजे जखऱ्‍या असं ठेवू.’ पण जखऱ्‍याने त्यांना लिहून दाखवलं: ‘याचं नाव योहान आहे.’ त्याच वेळी जखऱ्‍या पुन्हा बोलू लागला! जखऱ्‍याच्या बाळाबद्दलची बातमी पूर्ण यहूदीया राज्यात पसरली आणि लोक विचार करू लागले: ‘हा मुलगा मोठा होऊन काय बनेल?’

त्यानंतर पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन जखऱ्‍याने अशी भविष्यावाणी केली: ‘यहोवाची स्तुती होवो! त्याने अब्राहामला वचन दिलं होतं, की तो आपल्याला वाचवण्यासाठी एका मसीहाला पाठवेल. योहान एक संदेष्टा बनेल आणि तो त्या मसीहासाठी मार्ग तयार करेल.’

अलीशिबाची एक नातेवाईक होती. तिचं नाव होतं मरीया. मरीयासोबतसुद्धा एक खास गोष्ट घडली. ती गोष्ट कोणती होती, हे आपण पुढच्या धड्यात पाहू या.

“माणसांना हे अशक्य आहे, पण देवाला सर्वकाही शक्य आहे.”—मत्तय १९:२६