व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ६९

गब्रीएल मरीयाला भेटायला येतो

गब्रीएल मरीयाला भेटायला येतो

मरीया नावाची एक तरुण स्त्री अलीशिबाची नातेवाईक होती. ती गालीलमधल्या नासरेथ शहरात राहायची. योसेफ नावाच्या पुरुषाशी तिचं लग्न ठरलं होतं. योसेफ एक सुतार होता. अलीशिबा गरोदर राहून सहा महिने झाले, तेव्हा गब्रीएल देवदूत मरीयाला भेटायला आला. त्याने तिला म्हटलं: ‘मरीया, यहोवाचा तुझ्यावर आशीर्वाद आहे.’ गब्रीएलला नेमकं काय म्हणायचं होतं, हे मरीयाला कळलंच नाही. मग त्याने पुढे म्हटलं: ‘तू गरोदर राहशील आणि तुला एक मुलगा होईल. तू त्याचं नाव येशू ठेव. तो एक राजा बनेल आणि त्याचं राज्य नेहमीसाठी राहील.’

यावर मरीयाने म्हटलं: ‘पण माझं तर लग्नसुद्धा झालेलं नाही, मी एक कुमारी आहे. मग मला मूल कसं होईल?’ गब्रीएलने तिला उत्तर दिलं: ‘यहोवासाठी सर्वकाही शक्य आहे. तुझ्यावर पवित्र आत्मा येईल आणि तुला एक मुलगा होईल. तुझ्या नात्यातली अलीशिबा, हिलाही बाळ होणार आहे.’ त्यानंतर मरीयाने म्हटलं: ‘मी यहोवाची दासी आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणेच माझ्या बाबतीत घडो.’

त्यानंतर मरीया डोंगरात असलेल्या शहरात अलीशिबाला भेटायला गेली. जेव्हा मरीयाने तिला हाक मारून नमस्कार केला, तेव्हा अलीशिबाच्या पोटातल्या बाळाने उडी मारली. अलीशिबावर देवाचा पवित्र आत्मा आला आणि तिने म्हटलं: ‘मरीया, यहोवाने तुला आशीर्वाद दिला आहे. मसीहाच्या आईने माझ्या घरी यावं, हा माझ्यासाठी किती मोठा सन्मान आहे!’ यावर मरीयाने म्हटलं: ‘मी यहोवाचा मनापासून धन्यवाद करते.’ मरीया अलीशिबाच्या घरी तीन महिने राहिली आणि त्यानंतर ती नासरेथला परत गेली.

मरीया गरोदर असल्याचं जेव्हा योसेफला कळलं, तेव्हा तिच्याशी ठरलेलं लग्न त्याला मोडायचं होतं. पण देवदूताने योसेफला स्वप्नात येऊन म्हटलं: ‘मरीयाशी लग्न करायला घाबरू नकोस. तिने काहीही चुकीचं केलेलं नाही.’ यामुळे योसेफने तिच्याशी लग्न करून तिला आपल्या घरी आणलं.

“परमेश्‍वराला जे काही बरे वाटते ते तो आकाशात व पृथ्वीवर . . . करतो.”—स्तोत्र १३५:६