व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ७०

देवदूत येशूच्या जन्माबद्दल घोषणा करतात

देवदूत येशूच्या जन्माबद्दल घोषणा करतात

कैसर औगुस्त हा रोमी साम्राज्याचा राजा होता. त्याने हुकूम काढला, की सर्व यहुदी लोकांनी आपआपल्या मूळ गावी जाऊन आपल्या नावांची नोंदणी करावी. योसेफचं मूळ गाव बेथलेहेम होतं. यामुळे योसेफ आणि मरीया बेथलेहेमला गेले. मरीयाला बाळ होण्याची वेळ जवळ आली होती.

बेथलेहेमला पोचल्यावर त्यांना राहण्यासाठी जागा मिळाली नाही. यामुळे ते एका गोठ्यात थांबले. तिथेच मरीयाने येशूला जन्म दिला. तिने त्याला मऊ कापडांत गुंडाळून गव्हाणीत ठेवलं.

बेथलेहेमजवळ काही मेंढपाळ आपल्या मेंढरांची राखण करण्यासाठी रात्रीच्या वेळी बाहेर होते. अचानक त्यांच्यासमोर एक देवदूत येऊन उभा राहिला आणि त्यांच्याभोवती प्रकाश झाला. हा प्रकाश यहोवाकडून होता. हे पाहून मेंढपाळ घाबरले. पण देवदूताने त्यांना म्हटलं: ‘घाबरू नका, मी तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आणली आहे. आज बेथलेहेममध्ये मसीहाचा जन्म झाला आहे.’ इतक्यात आकाशात खूपसारे देवदूत दिसू लागले आणि ते म्हणाले: ‘स्वर्गातल्या देवाचा गौरव असो आणि पृथ्वीवरील लोकांना शांती मिळो.’ इतकं बोलून ते देवदूत नाहीसे झाले. त्यानंतर मेंढपाळांनी काय केलं?

त्यांनी एकमेकांना म्हटलं: ‘चला आताच्या आता बेथलेहेमला जाऊ या.’ त्यानंतर ते लगेच बेथलेहेमला गेले. तिथे त्यांना गोठ्यात योसेफ व मरीया दिसले. त्यांचं बाळही त्यांच्यासोबत होतं.

मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टी ज्यांनी-कोणी ऐकल्या, त्या सर्वांना आश्‍चर्य झालं. देवदूताने सांगितलेल्या गोष्टींवर मरीयाने खूप विचार केला. आणि ती त्या कधीच विसरली नाही. ऐकलेल्या व पाहिलेल्या सर्व गोष्टींविषयी देवाचे आभार मानून मेंढपाळ आपल्या मेंढरांकडे परत गेले.

“मी देवापासून आलो आणि आता इथे आहे. मी स्वतःच्या इच्छेने आलो नाही, तर त्याने मला पाठवलं आहे.”—योहान ८:४२