व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ७१

यहोवाने येशूचं रक्षण केलं

यहोवाने येशूचं रक्षण केलं

इस्राएल राष्ट्राच्या पूर्वेकडे एक देश होता. त्या देशातले लोक मानायचे, की आकाशातले तारे आपल्याला मार्ग दाखवू शकतात. एका रात्री त्या देशातल्या काही माणसांना आकाशात एक चमकदार तारा दिसला. तो तारा पुढे-पुढे सरकत होता. ती माणसं त्या ताऱ्‍याच्या मागे चालू लागली. तो चमकदार “तारा” त्यांना यरुशलेममध्ये घेऊन गेला. मग त्या माणसांनी तिथल्या लोकांना विचारलं: ‘यहुदी लोकांचा जो राजा जन्मला आहे, तो कुठे आहे? आम्ही त्याला नमस्कार करायला आलो आहोत.’

त्या काळात हेरोद हा यरुशलेमचा राजा होता. त्याला जेव्हा एका नवीन राजाबद्दलची बातमी कळली, तेव्हा तो खूप घाबरला. त्याने सर्व मुख्य याजकांना बोलवलं आणि विचारलं: ‘या राजाचा जन्म कुठे होणार होता?’ त्यांनी राजाला म्हटलं: ‘संदेष्ट्यांनी सांगितलं होतं, की त्याचा जन्म बेथलेहेममध्ये होईल.’ तेव्हा हेरोदने पूर्वेकडून आलेल्या त्या माणसांना बोलावून घेतलं आणि त्यांना म्हटलं: ‘बेथलेहेमला जाऊन त्या बाळाला शोधून काढा. तुम्हाला तो सापडला की मला येऊन सांगा. कारण मलासुद्धा जाऊन त्याला नमस्कार करायचा आहे.’ पण, खरंतर हेरोद खोटं बोलत होता.

तो “तारा” पुन्हा पुढे-पुढे सरकू लागला. ती पूर्वेकडची माणसं त्याच्या मागोमाग बेथलेहेमला येऊन पोचली. मग तो “तारा” एका घरावर येऊन थांबला आणि ती माणसं त्या घरात गेली. आत येशू आणि त्याची आई मरीया होती. त्यांनी येशूला वाकून नमस्कार केला. त्यानंतर त्या माणसांनी त्याला भेटवस्तू म्हणून सोनं, सुगंधित धूप आणि गंधरस दिला. पण येशूला शोधण्यासाठी, यहोवाने या लोकांना पाठवलं होतं का? नाही.

त्याच रात्री यहोवाने स्वप्नात योसेफला म्हटलं: ‘हेरोद येशूला मारून टाकण्याचा विचार करत आहे. त्यामुळे तुझ्या बायकोला आणि मुलाला घेऊन मिसर देशात पळून जा. आता इथे कोणताही धोका नाही असं जेव्हा मी तुला सांगेन, तेव्हाच तू परत ये.’ योसेफ लगेच त्याच्या कुटुंबाला घेऊन मिसरला निघून गेला.

यहोवाने पूर्वेकडच्या त्या माणसांना सांगितलं होतं, की त्यांनी पुन्हा हेरोदकडे जाऊ नये. आता काही ती माणसं परत येणार नाहीत असं जेव्हा हेरोदला वाटलं, तेव्हा त्याला खूप राग आला. हेरोद येशूला शोधू शकला नाही. म्हणून त्याने बेथलेहेममधल्या येशूच्या वयाच्या सर्व लहान मुलांना मारून टाकण्याची आज्ञा दिली. पण येशू मात्र वाचला, कारण तो अगदी दूर मिसर देशात सुरक्षित होता.

काही काळाने हेरोद मरून गेला. मग यहोवाने योसेफला सांगितलं: ‘आता तू परत जाऊ शकतोस. आता कोणताही धोका नाही.’ योसेफ, मरीया आणि येशू इस्राएलला परत गेले. तिथे ते नासरेथ शहरात राहू लागले.

“त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल; . . . ज्या कार्याकरता मी ते पाठवले ते केल्यावाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही.”—यशया ५५:११