व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ७२

येशूचं बालपण

येशूचं बालपण

येशू आपल्या आईवडिलांसोबत, म्हणजे योसेफ आणि मरीयासोबत नासरेथला राहायचा. योसेफ आणि मरीया यांना आणखी मुलं आणि मुलीसुद्धा होत्या. योसेफ सुतारकाम करून आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करायचा. तसंच, तो यहोवा आणि त्याच्या नियमांबद्दलही आपल्या कुटुंबाला शिकवायचा. तो नियमितपणे आपल्या कुटुंबासोबत उपासना करण्यासाठी सभास्थानात जायचा. यासोबतच, दरवर्षी वल्हांडणाचा सण साजरा करायला ते यरुशलेमलाही जायचे.

येशू १२ वर्षांचा असताना नेहमीप्रमाणे आपल्या कुटुंबासोबत यरुशलेमला गेला. यरुशलेमचा प्रवास खूप लांबचा होता. वल्हांडणाचा सण साजरा करण्यासाठी, यरुशलेममध्ये खूप लोक जमा झाले होते. सण साजरा करून योसेफ आणि मरीया घरी परत जायला निघाले. त्यांच्यासोबत इतर लोक आणि नातेवाईकही होते. योसेफ आणि मरीयाला वाटलं, की येशू त्यांच्यासोबत आहे. पण जेव्हा त्यांनी येशूला शोधलं तेव्हा त्यांना कळलं, की तो त्यांच्यासोबत नव्हता. तो त्यांना कुठेच सापडला नाही.

यामुळे ते यरुशलेमला परत गेले. तीन दिवसांपर्यंत ते त्याला शोधत राहिले. शेवटी येशू त्यांना मंदिरात सापडला. देवाचे नियम शिकवणाऱ्‍या शिक्षकांच्या मध्ये तो बसला होता. शिक्षक जे शिकवत होते, ते तो नीट लक्ष देऊन ऐकत होता. आणि तो त्यांना काही चांगले प्रश्‍नही विचारत होता. शिक्षकांना येशूचं खूप कौतुक वाटलं आणि म्हणून त्यांनी त्याला प्रश्‍न विचारले. त्याने दिलेली उत्तरं ऐकून त्यांना खूप आश्‍चर्य वाटलं. त्यांना कळलं की येशूला यहोवाच्या नियमांबद्दल चांगली समज होती.

योसेफ आणि मरीयाला खूप काळजी लागली होती. मरीया येशूला म्हणाली: ‘बाळा, आम्ही तुला सगळीकडे शोधत होतो! कुठे होतास तू?’ येशूने उत्तर दिलं: ‘मी माझ्या पित्याच्या घरात असेन, हे तुम्हाला माहीत नव्हतं का?’

मग येशू आपल्या आईवडिलांसोबत नासरेथला परत गेला. योसेफने येशूला सुतारकाम शिकवलं. तरुणपणात येशूचा स्वभाव कसा होता? तुला काय वाटतं? तो जसजसा मोठा होत गेला, तसतसा तो बुद्धिमान होत गेला. तसंच, देवाचं आणि लोकांचं त्याच्यावर असलेलं प्रेमसुद्धा वाढत गेलं.

“हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे, तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे.”—स्तोत्र ४०:८