व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ७३

योहान मार्ग तयार करतो

योहान मार्ग तयार करतो

जखऱ्‍या आणि अलीशिबाचा मुलगा योहान हा मोठा झाल्यावर संदेष्टा बनला. यहोवाने त्याला एक काम दिलं. येणाऱ्‍या मसीहाबद्दल त्याला लोकांना सांगायचं होतं. सभास्थानात किंवा शहरात जाऊन शिकवण्याऐवजी तो लोकांना ओसाड रानात शिकवायचा. यरुशलेम आणि सर्व यहूदीया राज्यातले लोक योहानकडे शिकायला यायचे. देवाचं मन आनंदित करण्यासाठी त्यांनी आपली वाईट कामं सोडली पाहिजेत, असं तो शिकवायचा. योहानचा संदेश ऐकल्यानंतर, खूप लोकांनी आपल्या पापांची क्षमा मागितली आणि पाप करायचं सोडून दिलं. मग त्या लोकांना योहानने यार्देन नदीत बाप्तिस्मा दिला.

योहान एक साधं जीवन जगायचा. तो उंटाच्या केसांनी बनलेले कपडे घालायचा आणि टोळ व रानातलं मध खायचा. लोकांना योहानबद्दल खूप उत्सुकता वाटायची. इतकंच काय, तर गर्विष्ठ धर्मगुरू म्हणजे परूशी आणि सदूकी हेसुद्धा त्याला पाहायला यायचे. योहानने त्या धर्मगुरूंना म्हटलं: ‘तुम्ही क्षमा मागून तुमची वाईट कामं सोडून दिली पाहिजेत. तुम्ही खास लोक आहात असं समजू नका. कारण, तुम्ही अब्राहामची मुलं आहात असं म्हणत असलात, तरी तुम्ही देवाची मुलं आहात असा याचा अर्थ होत नाही.’

खूप लोक योहानकडे यायचे आणि त्याला विचारायचे: ‘देवाला खूश करण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे?’ योहान त्यांना म्हणायचा: ‘जर तुमच्याकडे दोन झगे असतील, तर त्यातला एक झगा गरज असलेल्या व्यक्‍तीला द्या.’ योहान असं का बोलला, हे तुला माहीत आहे? कारण त्याला लोकांना शिकवायचं होतं, की जर आपण इतरांवर प्रेम केलं, तरच आपण देवाला खूश करू शकतो.

योहानने कर वसूल करणाऱ्‍यांना सांगितलं: ‘प्रामाणिकपणे वागा. लोकांना फसवू नका.’ तसंच, त्याने सैनिकांना म्हटलं: ‘कोणाकडून लाच घेऊ नका आणि खोटंही बोलू नका.’

याजक आणि लेवीसुद्धा योहानकडे आले आणि त्यांनी त्याला विचारलं: ‘तू कोण आहेस? सर्वांना तुझ्याबद्दल माहीत करून घ्यायचं आहे.’ योहानने उत्तर दिलं: ‘यशया संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे, मी ओसाड रानातला तो आवाज आहे, जो यहोवाजवळ जाण्यासाठी लोकांचं मार्गदर्शन करतो.’

योहान जे शिकवायचा ते लोकांना आवडायचं. कदाचित हाच तो मसीहा असावा, असं खूप लोकांना वाटायचं. पण त्याने लोकांना म्हटलं: ‘जो मसीहा येणार आहे, तो माझ्यापेक्षाही महान आहे. माझी तर त्याच्या पायातल्या चपला काढण्याचीही योग्यता नाही. मी लोकांना पाण्याने बाप्तिस्मा देतो. पण तो मात्र पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देईल.’

“हा मनुष्य एक साक्षी होता; तो त्या प्रकाशाबद्दल साक्ष देण्यासाठी आला, जेणेकरून सर्व प्रकारच्या लोकांनी त्याच्याद्वारे विश्‍वास ठेवावा.”—योहान १:७