व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ७५

सैतान येशूची परीक्षा घेतो

सैतान येशूची परीक्षा घेतो

येशूचा बाप्तिस्मा झाल्यानंतर, पवित्र आत्मा त्याला अरण्यात घेऊन गेला. येशूने ४० दिवस काहीच खाल्लं नाही. त्यामुळे त्याला खूप भूक लागली. तेव्हा सैतान येशूची परीक्षा घेण्यासाठी त्याच्याकडे आला. तो येशूला म्हणाला: ‘जर तू खरोखरंच देवाचा मुलगा आहेस, तर या दगडांना भाकरी बनायला सांग.’ पण येशूने शास्त्रातल्या वचनाचा वापर करून त्याला म्हटलं: ‘असं लिहिलं आहे, की जगण्यासाठी फक्‍त अन्‍न नाही तर यहोवा देवाची प्रत्येक गोष्ट ऐकण्याची गरज आहे.’

त्यानंतर सैतानाने येशूला म्हटलं: ‘जर तू खरंच देवाचा पुत्र असशील, तर मंदिराच्या सर्वात उंच ठिकाणावरून खाली उडी टाक. कारण लिहिलं आहे, की तुला वाचवण्यासाठी देव आपल्या दूतांना पाठवेल.’ पण या वेळीसुद्धा येशूने वचनाचा वापर करून उत्तर दिलं: ‘असंही लिहिलं आहे, की तू तुझा देव यहोवा याची परीक्षा घेऊ नकोस.’

मग सैतानाने येशूला जगातली सर्व राज्यं आणि त्यांतली संपत्ती व त्यांचं वैभव दाखवलं. त्याने येशूला म्हटलं: ‘तू फक्‍त एकदा माझी उपासना कर, मग मी ही सर्व राज्यं आणि त्यांचं वैभव तुला देईन.’ पण येशूने उत्तर दिलं: ‘अरे सैताना! चालता हो! कारण लिहिलं आहे, की आपण फक्‍त यहोवा देवाचीच उपासना केली पाहिजे.’

मग सैतान निघून गेला आणि देवदूतांनी येऊन येशूला अन्‍न दिलं. त्यानंतर येशूने प्रचाराचं काम सुरू केलं. त्याने लोकांना देवाच्या राज्याबद्दलचा आनंदाचा संदेश सांगितला. येशूला याच कामासाठी पृथ्वीवर पाठवण्यात आलं होतं. येशू लोकांना जे शिकवायचा ते त्यांना आवडायचं. आणि यामुळे तो जिथे कुठे जायचा, तिथे लोक त्याच्या मागोमाग जायचे.

“[सैतान] खोटं बोलतो तेव्हा त्याच्या मूळ स्वभावानुसारच बोलतो, कारण तो खोटारडा आणि खोटेपणाचा बाप आहे.”—योहान ८:४४