व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ७७

विहिरीवर आलेली स्त्री

विहिरीवर आलेली स्त्री

वल्हांडण सणानंतर काही काळाने, येशू आणि त्याचे शिष्य गालील प्रदेशात जायला निघाले. ते शोमरोन प्रदेशातून जात असताना, सूखार शहराजवळ असलेल्या याकोबच्या विहिरीकडे पोचले. येशूचे शिष्य काहीतरी खायला आणण्यासाठी शहरात गेले. तोपर्यंत येशू तिथेच विहिरीजवळ आराम करण्यासाठी थांबला.

तेव्हा एक स्त्री त्या विहिरीवर पाणी भरायला आली. येशूने तिला म्हटलं: “मला प्यायला पाणी दे.” यावर तिने म्हटलं: ‘तुम्ही माझ्याशी का बोलत आहात? मी तर एक शोमरोनी स्त्री आहे आणि यहुदी लोक शोमरोनी लोकांशी बोलत नाहीत.’ येशू तिला म्हणाला: ‘जर तुला माहीत असतं की मी कोण आहे, तर तूच माझ्याकडे पाणी मागितलं असतं आणि मी तुला जीवन देणारं पाणी दिलं असतं.’ ती स्त्री म्हणाली: ‘तुम्ही काय बोलत आहात ते मला कळत नाही आणि तुमच्याकडे तर बादलीसुद्धा नाही.’ येशूने तिला उत्तर दिलं: ‘मी दिलेलं पाणी जो कोणी पिईल, त्याला पुन्हा कधीच तहान लागणार नाही.’ मग स्त्रीने म्हटलं: ‘मलासुद्धा ते पाणी द्या.’

त्यानंतर येशू तिला म्हणाला: ‘तुझ्या पतीला इथे विहिरीवर घेऊन ये.’ ती म्हणाली: ‘मला पती नाही.’ यावर येशूने तिला म्हटलं: ‘तू खरं बोललीस. तुझं पाच वेळा लग्न झालं आहे आणि आता ज्या माणसासोबत तू राहत आहेस, त्याच्याशी तुझं लग्न झालेलं नाही.’ स्त्रीने म्हटलं: ‘मला वाटतं तुम्ही एक संदेष्टे आहात. माझे लोक मानतात, की देवाची उपासना करण्यासाठी या डोंगरावर आलं पाहिजे. आणि यहुदी लोकांचं म्हणणं आहे, की उपासना करण्यासाठी आपण यरुशलेमला गेलं पाहिजे. पण, माझा विश्‍वास आहे की जेव्हा मसीहा येईल, तेव्हा उपासना कशी करायची हे तोच आम्हाला शिकवेल.’ यानंतर येशूने तिला अशी एक गोष्ट सांगितली, जी याआधी त्याने कोणालाही सांगितली नव्हती. तो तिला म्हणाला: ‘मीच मसीहा आहे.’

ती स्त्री घाईघाईने आपल्या शहराकडे गेली आणि तिने शोमरोनी लोकांना म्हटलं: ‘मला वाटतं की मला मसीहा सापडला आहे. त्याला माझ्याबद्दल सर्वकाही माहीत आहे. चला तुम्हीच येऊन पाहा!’ त्यानंतर ते लोक तिच्या मागोमाग विहिरीजवळ गेले. येशूने त्यांना जे शिकवलं, ते त्यांनी लक्ष देऊन ऐकलं.

मग शोमरोनी लोकांनी येशूला आपल्या शहरात राहण्यासाठी बोलवलं. येशूने दोन दिवस तिथल्या लोकांना शिकवलं आणि बऱ्‍याच लोकांनी त्याच्यावर विश्‍वास दाखवला. त्या लोकांनी शोमरोनी स्त्रीला म्हटलं: ‘या मनुष्याचं ऐकल्यानंतर आम्हाला खात्री पटली आहे, की हाच जगाचं तारण करेल.’

“‘ये!’ आणि जो तहानलेला आहे त्याने यावे; आणि ज्या कोणाला जीवनाचे पाणी हवे आहे, त्याने ते मोफत घ्यावे.”—प्रकटीकरण २२:१७