व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ७८

येशू राज्याचा संदेश घोषित करतो

येशू राज्याचा संदेश घोषित करतो

बाप्तिस्मा घेतल्याच्या काही काळानंतर येशूने प्रचारकार्य सुरू केलं. ‘देवाचं राज्य जवळ आलं आहे,’ असा त्याने प्रचार केला. तो गालील आणि यहूदीया राज्यात प्रचार करण्यासाठी गेला, तेव्हा त्याचे शिष्यही त्याच्यासोबत गेले. येशू आपल्या शहरात म्हणजे नासरेथमध्ये परत आला, तेव्हा तो सभास्थानात गेला. तिथे त्याने यशयाची गुंडाळी उघडली. त्यातून त्याने सर्वांसमोर मोठ्याने असं वाचलं: ‘यहोवाने मला आनंदाचा संदेश सांगण्यासाठी त्याचा पवित्र आत्मा दिला आहे.’ या वचनाचा काय अर्थ होतो? हाच की लोकांना जरी वाटत असलं की येशूने चमत्कार करावेत, तरी येशूला देवाचा पवित्र आत्मा खासकरून आनंदाचा संदेश सांगण्यासाठी मिळाला होता. गुंडाळीतला तो भाग वाचून झाल्यानंतर त्याने लोकांना म्हटलं: ‘ही भविष्यवाणी आज पूर्ण झाली आहे.’

यानंतर येशू गालील समुद्राकडे गेला. तिथे त्याला पेत्र, अंद्रिया, याकोब आणि योहान हे चौघं भेटले. त्यांचा मासे धरण्याचा व्यवसाय होता. तो त्यांना म्हणाला: ‘माझ्यामागे या. मी तुम्हाला माणसे धरणारे करेन.’ त्यांनी लगेच मासे धरण्याचा आपला व्यवसाय सोडला आणि ते येशूच्या मागे गेले. ते त्याचे शिष्य बनले. यहोवाच्या राज्याबद्दल प्रचार करत ते पूर्ण गालीलमध्ये फिरले. त्यांनी सभास्थानात, बाजारात आणि रस्त्यांवर प्रचार केला. ते जिथे कुठे जायचे, तिथे खूपसारे लोक त्यांच्या मागे यायचे. येशूबद्दलची बातमी सगळीकडे पसरली. अगदी दूर असलेल्या सूरिया प्रदेशातही.

काही काळानंतर येशूने त्याच्या काही शिष्यांना, लोकांना बरं करण्याची आणि दुरात्मे काढण्याची शक्‍ती दिली. तो प्रचारासाठी जेव्हा वेगवेगळ्या गावांत आणि शहरांत गेला, तेव्हा त्याचे काही शिष्यही त्याच्यासोबत गेले. मरीया मग्दालीया, योहान्‍ना, सुसान्‍ना यांच्यासारख्या अनेक विश्‍वासू स्त्रियांनी, येशूची आणि त्याच्या शिष्यांची काळजी घेतली.

आपल्या शिष्यांना प्रचार करायला शिकवल्यानंतर, येशूने त्यांना प्रचारकार्यासाठी पाठवलं. त्यांनी संपूर्ण गालीलमध्ये प्रचार केला. अनेक जण शिष्य बनले आणि त्यांनी बाप्तिस्मा घेतला. अजूनही खूपसाऱ्‍या लोकांना शिष्य बनायची इच्छा होती. त्यांची संख्या इतकी जास्त होती, की येशूने त्यांची तुलना कापणीसाठी तयार असलेल्या एका शेतासोबत केली. त्यामुळे येशूने म्हटलं: ‘पिकाची कापणी करण्यासाठी यहोवाने आणखी कामगारांना पाठवावं यासाठी प्रार्थना करा.’ नंतर त्याने त्याच्या शिष्यांमधून ७० जणांना निवडलं. त्याने त्यांना जोडी-जोडीने पूर्ण यहूदीया राज्यात प्रचार करण्यासाठी पाठवलं. त्या शिष्यांनी, देवाच्या राज्याविषयी सर्व प्रकारच्या लोकांना शिकवलं. शिष्य प्रचार करून परत आले, तेव्हा प्रचारात आलेले अनुभव येशूला सांगण्यासाठी ते खूप उत्सुक होते. सैतान त्यांचं प्रचारकार्य काही केल्या थांबवू शकत नव्हता.

येशूने या गोष्टीची खात्री करून घेतली, की तो स्वर्गात गेल्यानंतरही त्याचे शिष्य प्रचाराचं हे महत्त्वपूर्ण काम करत राहतील. त्याने त्यांना अशी आज्ञा दिली: ‘पूर्ण पृथ्वीवर आनंदाच्या संदेशाचा प्रचार करा. लोकांना देवाच्या वचनाबद्दल शिकवा आणि त्यांना बाप्तिस्मा द्या.’

“मला इतर शहरांतही देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश घोषित केला पाहिजे, कारण मला यासाठीच पाठवण्यात आलं आहे.”—लूक ४:४३