व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ७९

येशू अनेक चमत्कार करतो

येशू अनेक चमत्कार करतो

येशू या पृथ्वीवर देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश सांगण्यासाठी आला होता. असं असलं, तरी यहोवाने त्याला चमत्कार करण्यासाठीही पवित्र आत्मा दिला होता. कारण राजा बनल्यावर तो काय-काय करणार आहे, हे लोकांना समजावं अशी देवाची इच्छा होती. येशू कोणताही आजार बरा करू शकत होता. तो जिथे कुठे जायचा, तिथे आजारी लोक मदतीसाठी त्याच्याकडे यायचे. येशू त्या सर्वांना बरं करायचा. त्यामुळे आंधळ्यांना दिसू लागलं, बहिऱ्‍यांना ऐकू येऊ लागलं आणि लकवा मारलेले लोक चालू लागले. इतकंच काय, तर दुरात्म्यांचा प्रभाव असलेले लोकसुद्धा बरे व्हायचे. लोकांनी फक्‍त येशूच्या कपड्यांच्या काठाला जरी स्पर्श केला, तरी ते बरे व्हायचे. येशू जिथेही जायचा तिथे लोक त्याच्या मागे यायचे. लोक जेव्हा त्याच्या आराम करण्याच्या वेळेत त्याच्याकडे यायचे, तेव्हाही तो त्यांना मदत करायचा.

एकदा येशू ज्या घरात थांबला होता, त्या ठिकाणी काही लोक लकवा मारलेल्या एका माणसाला घेऊन आले. पण, गर्दी असल्यामुळे त्याला आत नेता येत नव्हतं. त्यामुळे त्यांनी घराच्या छताचा काही भाग उघडला आणि त्याला तिथून खाली उतरवलं. तेव्हा येशूने लकवा मारलेल्या त्या माणसाला म्हटलं: ‘ऊठ आणि चाल.’ तेव्हा तो चालू लागला. त्याला चालताना पाहून लोकांना खूप आश्‍चर्य वाटलं.

एकदा येशू एका गावात गेला, तेव्हा तिथे त्याला कुष्ठरोग झालेले दहा लोक दिसले. त्या काळात कुष्ठरोग झालेल्यांना, लोकांच्या जवळ येण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे ते दुरूनच असं ओरडू लागले: ‘येशू, आमची मदत कर!’ येशूने त्यांना मंदिरात जायला सांगितलं. यहोवाच्या नियमानुसार रोग्यांनी बरं झाल्यावर देवाच्या मंदिरात जाण्याची गरज होती. येशूने सांगितल्याप्रमाणे ते कुष्ठरोगी मंदिरात जायला निघाले. आणि आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, रस्त्याने जात असतानाच ते बरे झाले. तेव्हा त्यांच्यापैकी एक येशूचे आभार मानायला परत आला. त्याने देवाची स्तुतीसुद्धा केली. त्या दहा कुष्ठरोग्यांपैकी फक्‍त या एकानेच येशूचे आभार मानले.

बारा वर्षांपासून आजारी असलेली एक स्त्री खूप त्रासात होती. बरं होण्यासाठी तिने खूप धडपड केली होती. ती गर्दीतून येशूच्या मागे आली आणि तिने त्याच्या कपड्यांच्या काठाला स्पर्श केला. तेव्हा ती लगेच बरी झाली. येशूने विचारलं: “मला कोणी स्पर्श केला?” ती स्त्री खूप घाबरली. पण, ती येशूकडे आली आणि तिने त्याला सर्वकाही खरं-खरं सांगितलं. येशूने तिला सांत्वन देत म्हटलं: ‘मुली, चिंता करू नकोस, शांतीने जा.’

एकदा याईर नावाचा एक अधिकारी येशूकडे आला. तो येशूला विनंती करत म्हणाला: ‘कृपा करून माझ्या घरी चला! माझी लहान मुलगी खूप आजारी आहे.’ पण येशू तिथे पोचला, तोपर्यंत ती मुलगी मरून गेली होती. त्याच्या घरी खूपसारे लोक जमले होते. मुलीच्या मृत्यूमुळे ते दुःखी होऊन रडत होते. येशूने त्यांना म्हटलं: ‘रडू नका. ती तर फक्‍त झोपली आहे.’ मग येशूने त्या मुलीचा हात धरला आणि म्हटलं: “मुली, मी तुला सांगतो, ऊठ!” ती लगेच उठून बसली. त्यानंतर, येशूने तिच्या आईवडिलांना सांगितलं, की तिला काहीतरी खायला द्या. तिच्या आईवडिलांना खरंच किती आनंद झाला असेल, नाही का?

“त्याला देवाने पवित्र आत्म्याने व सामर्थ्याने अभिषिक्‍त केलं आणि तो चांगली कामं करत आणि सैतानाने पीडित केलेल्या लोकांना बरं करत सबंध देशभर फिरला, कारण देव त्याच्यासोबत होता.”—प्रेषितांची कार्ये १०:३८