व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ८२

येशू शिष्यांना प्रार्थना करायला शिकवतो

येशू शिष्यांना प्रार्थना करायला शिकवतो

परूशी लोक जे काही करायचे, ते फक्‍त लोकांकडून प्रशंसा मिळवण्यासाठी करायचे. इतरांनी आपल्याला पाहावं या हेतूनेच ते दुसऱ्‍यांची मदत करायचे. सर्व लोक त्यांना पाहू शकतील अशा सार्वजनिक ठिकाणी ते प्रार्थना करायचे. ते लांबलचक प्रार्थना तोंडपाठ करायचे. मग ते सभास्थानांत आणि रस्त्यांवर जिथे लोकांना ऐकू जाईल अशा ठिकाणी या प्रार्थना जोर-जोराने म्हणायचे. त्यामुळे प्रार्थना कशी करावी याबद्दल येशूने लोकांना सांगितलं, तेव्हा त्यांना आश्‍चर्य वाटलं. कारण येशू त्यांना म्हणाला: ‘परूशी लोकांसारखी प्रार्थना करू नका. त्यांना वाटतं की त्यांनी जर मोठमोठ्या प्रार्थना केल्या, तर देवाला त्या आवडतील. पण, ही गोष्ट खरी नाही. कारण, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही इतरांसोबत नाही तर फक्‍त देवासोबत बोलत असता. त्यामुळे त्याच त्या गोष्टी पुन्हा-पुन्हा बोलू नका. तुम्ही आपल्या मनातल्या गोष्टी यहोवाला सांगितल्या पाहिजेत असं त्याला वाटतं.’

मग येशूने पुढे म्हटलं: ‘तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना केली पाहिजे: “हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझं नाव पवित्र मानलं जावो. तुझं राज्य येवो. तुझी इच्छा जशी स्वर्गात पूर्ण होत आहे, तशी पृथ्वीवरही होवो.”’ येशूने त्यांना दररोजच्या अन्‍नासाठी, पापांची माफी मिळण्यासाठी आणि इतर काही वैयक्‍तिक गोष्टींसाठीही प्रार्थना करायला सांगितलं.

येशूने म्हटलं: ‘नेहमी प्रार्थना करत राहा. आपल्या पित्याकडे म्हणजे यहोवाकडे चांगल्या गोष्टी मागत राहा. सर्व आईवडिलांची आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी देण्याची इच्छा असते. जर तुमच्या मुलाने तुमच्याजवळ भाकर मागितली, तर तुम्ही त्याला दगड द्याल का? जर त्याने मासा मागितला, तर तुम्ही त्याला साप द्याल का?’

यावरून काय शिकायला मिळतं हे येशूने समजावून सांगितलं. तो म्हणाला: ‘आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी देण्याचं मानवांना समजतं. तर मग स्वर्गात राहणारा आपला पिता यहोवा, आपल्याला त्याचा पवित्र आत्मा देणार नाही का? तुम्हाला फक्‍त त्याच्याजवळ मागण्याची गरज आहे.’ तुझी प्रार्थनाही येशूने शिकवलेल्या प्रार्थनेसारखी असते का? तुझी प्रार्थना कोणकोणत्या गोष्टींविषयी असते?

“मागत राहा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल; शोधत राहा म्हणजे तुम्हाला सापडेल; आणि ठोठावत राहा म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल.”—मत्तय ७:७