व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ८४

येशू पाण्यावर चालतो

येशू पाण्यावर चालतो

येशूकडे आजारी लोकांना बरं करण्याची आणि मेलेल्या लोकांना जिवंत करण्याची शक्‍ती होती. पण यासोबतच, पाऊस आणि वारा यांच्यावरही त्याचा ताबा होता. एकदा येशू डोंगरावर प्रार्थना करत होता. प्रार्थना झाल्यावर त्याने खाली गालील समुद्राकडे पाहिलं. पाहतो तर काय, समुद्रात वादळ आलं होतं! त्याचे प्रेषित समुद्रात होते. खूप जोराचा वारा वाहत असल्यामुळे, बोट पुढे नेणं त्यांना कठीण जात होतं. मग येशू डोंगरावरून खाली आला आणि बोटीच्या दिशेने पाण्यावर चालू लागला. जेव्हा प्रेषितांनी पाहिलं, की कोणीतरी पाण्यावर चालत आपल्या दिशेने येत आहे, तेव्हा ते घाबरले. पण येशूने त्यांना म्हटलं: ‘घाबरू नका, मी आहे.’

तेव्हा पेत्र म्हणाला: ‘प्रभू, जर खरोखर तू आहेस, तर मला तुझ्याकडे येण्याची आज्ञा कर.’ येशूने पेत्रला म्हटलं: ‘ये माझ्याकडे.’ मग वादळ चालू असतानाच पेत्र बोटीबाहेर आला. तो पाण्यावर चालत येशूकडे जाऊ लागला. पण पेत्र येशूच्या जवळ पोचला, तेव्हा त्याचं लक्ष वादळाकडे गेलं. पेत्र घाबरला आणि बुडू लागला. तेव्हा तो ओरडला: ‘प्रभू, वाचव मला!’ तेवढ्यात येशूने त्याचा हात धरला आणि म्हटलं: ‘तुझ्या मनात शंका का आली? तू विश्‍वास का नाही ठेवलास?’

मग, येशू आणि पेत्र बोटीवर चढले आणि लगेच वादळ शांत झालं. हे सर्व पाहून प्रेषितांना कसं वाटलं? त्यांनी म्हटलं: “तू खरोखरच देवाचा पुत्र आहेस.”

येशूचं हवामानावर नियंत्रण आहे हे त्याने फक्‍त एकदाच नाही, तर आणखीन एका प्रसंगी दाखवून दिलं. एकदा येशू आणि त्याचे प्रेषित समुद्राच्या पलीकडे जात होते. येशू बोटीत झोपला होता. तेव्हा एक खूप मोठं वादळ आलं. समुद्राच्या लाटा बोटीवर जोरजोरात आपटत होत्या. बोटीत पाणी भरू लागलं. त्यामुळे प्रेषित ओरडून येशूला उठवू लागले: ‘गुरू वाचव! मरणार आपण!’ येशू उठला आणि त्याने समुद्राला म्हटलं: “शश्‍श! शांत हो!” त्याच क्षणी वारा वाहायचा बंद झाला आणि समुद्र शांत झाला. येशूने प्रेषितांना विचारलं: ‘कुठे गेला तुमचा विश्‍वास?’ तेव्हा प्रेषितांनी एकमेकांना म्हटलं: “वारा आणि समुद्रही त्याचं ऐकतात.” या चमत्कारांवरून प्रेषितांना एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळाला. तो म्हणजे, जर त्यांनी येशूवर पूर्णपणे विश्‍वास ठेवला, तर त्यांना कोणत्याही गोष्टीला घाबरण्याची गरज नाही.

“नीतिमान जन त्याच्या विश्‍वासामुळे जिवंत राहील.” —रोमकर १:१७