व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ८५

येशू शब्बाथाच्या दिवशी आजार बरा करतो

येशू शब्बाथाच्या दिवशी आजार बरा करतो

परूशी लोकांना येशूचा राग यायचा. म्हणून ते त्याला पकडण्याची संधी शोधू लागले. परूशी लोकांचं म्हणणं होतं, की येशूने शब्बाथाच्या दिवशी आजाऱ्‍यांना बरं करू नये. कारण शब्बाथ हा आराम करण्याचा दिवस होता. एकदा एका शब्बाथाच्या दिवशी येशूला एक आंधळा माणूस दिसला. हा माणूस रस्त्यावर भीक मागत होता. त्याला पाहून येशूने आपल्या शिष्यांना म्हटलं: ‘देवाची शक्‍ती या माणसाला कशी मदत करते ते पाहा.’ मग येशूने जमिनीवर थुंकून मातीचा लेप तयार केला. त्याने तो लेप आंधळ्या माणसाच्या डोळ्यांवर लावला. त्यानंतर येशू त्याला म्हणाला: ‘जा आणि शिलोहाच्या तळ्यात तुझे डोळे धू.’ त्या माणसाने तसंच केलं. तेव्हा आयुष्यात पहिल्यांदाच त्याला दिसू लागलं.

हे पाहून लोकांना धक्काच बसला. ते म्हणाले: ‘हा तोच माणूस आहे ना जो भीक मागायचा? की, त्याच्यासारखाच दिसणारा दुसरा कोणीतरी आहे?’ तो माणूस म्हणाला: ‘नाही, नाही. मीच तो आहे.’ लोकांनी त्याला विचारलं: ‘मग आता तुला कसं काय दिसू लागलं?’ त्याने त्या लोकांना सर्वकाही सांगितलं. हे ऐकून ते त्याला परूश्‍यांकडे घेऊन गेले.

तो माणूस परूश्‍यांना म्हणाला: ‘येशूने माझ्या डोळ्यांवर लेप लावला आणि मला डोळे धुऊन यायला सांगितलं. मी अगदी तसंच केलं. आणि आता मी पाहू शकतो.’ यावर परूशी म्हणाले: ‘येशू शब्बाथाच्या दिवशी लोकांना बरं करत आहे, म्हणजे ही शक्‍ती देवाकडून नाही.’ पण इतर लोक म्हणाले: ‘जर त्याची शक्‍ती देवाकडून नसती, तर तो आजार बरा करूच शकला नसता.’

परूश्‍यांनी त्या माणसाच्या आईवडिलांना बोलवलं आणि त्यांना विचारलं: ‘तुमचा मुलगा आता कसं काय पाहू लागला?’ त्याचे आईवडील घाबरले होते. कारण परूश्‍यांनी सांगितलं होतं, की जो कोणी येशूवर विश्‍वास ठेवेल त्याला सभास्थानातून काढून टाकलं जाईल. म्हणून त्याचे आईवडील म्हणाले: ‘आम्हाला काही माहीत नाही. तुम्ही त्यालाच विचारा.’ परूशी त्या माणसाला प्रश्‍न विचारतच राहिले. शेवटी तो म्हणाला: ‘मला जेवढं माहीत होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलं आहे. तुम्ही मला सारखं-सारखं एकच प्रश्‍न का विचारत आहात?’ हे ऐकून परूश्‍यांना खूप राग आला. त्यांनी त्याला तिथून हाकलून लावलं.

नंतर येशूने त्या माणसाला शोधलं आणि त्याला विचारलं: ‘तुझा मसीहावर विश्‍वास आहे का?’ यावर तो माणूस म्हणाला: ‘मसीहा कोण आहे हे मला माहीत असतं, तर मी नक्कीच विश्‍वास ठेवला असता.’ येशू म्हणाला: ‘मीच तो मसीहा आहे.’ येशू खरंच किती प्रेमळपणे वागला! त्याने त्या माणसाला बरं तर केलंच, पण यासोबतच मसीहावर विश्‍वास ठेवायलाही त्याला मदत केली.

“तुमचा गैरसमज झाला आहे, कारण तुम्हाला शास्त्रवचनांचं ज्ञान नाही आणि तुम्ही देवाचं सामर्थ्यदेखील जाणत नाही.”—मत्तय २२:२९