व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ८६

येशू लाजरचं पुनरुत्थान करतो

येशू लाजरचं पुनरुत्थान करतो

बेथानी इथे राहणारा लाजर आणि त्याच्या दोन बहिणी, मरीया आणि मार्था हे तिघं येशूचे खूप जवळचे मित्र होते. एकदा येशू यार्देनच्या पलीकडच्या भागात होता. तेव्हा मरीया आणि मार्थाने त्याला असा निरोप पाठवला: ‘लाजर खूप आजारी आहे. लवकर इथे ये!’ पण, येशू लगेच गेला नाही. तो आणखीन दोन दिवस तिथेच राहिला. यादरम्यान लाजर मरून गेला. मग, येशूने त्याच्या शिष्यांना म्हटलं: ‘चला आपण बेथानीला जाऊ. लाजर झोपला आहे आणि तिथे जाऊन मी त्याला उठवणार आहे.’ यावर प्रेषित म्हणाले: ‘लाजर झोपला असेल तर चांगलंच आहे. यामुळे तो बरा होईल.’ हे ऐकल्यावर येशूने त्यांना स्पष्टपणे असं म्हटलं: ‘लाजर मेला आहे.’

येशू बेथानी इथे पोचला, तोपर्यंत लाजरला मरून चार दिवस झाले होते. त्याला पुरण्यात आलं होतं. खूपसारे लोक मार्था आणि मरीयाचं सांत्वन करण्यासाठी आले होते. जेव्हा मार्थाने ऐकलं की येशू आला आहे, तेव्हा ती घाईघाईने त्याला भेटायला गेली. तिने त्याला म्हटलं: “प्रभू, तू इथे असता तर माझा भाऊ मेला नसता.” येशूने तिला म्हटलं: ‘तुझा भाऊ मेला असला तरी पुन्हा जिवंत होईल. मार्था, या गोष्टीवर तुझा विश्‍वास आहे ना?’ ती म्हणाली: ‘हो प्रभू. तो पुनरुत्थानात उठेल हे मला माहीत आहे.’ येशूने तिला म्हटलं: “पुनरुत्थान व जीवन मीच आहे.”

मग, मार्था मरीयाकडे गेली. तिने तिला सांगितलं: ‘येशू आला आहे.’ मरीया धावतच येशूला भेटायला गेली. तिथे आलेले लोकही तिच्या मागेमागे गेले. ती येशूकडे गेली आणि त्याच्या पाया पडून खूप रडू लागली. तिने येशूला म्हटलं: ‘प्रभू तू इथे असता तर आमचा भाऊ आज जिवंत असता!’ तिचं दुःख पाहून येशूही रडू लागला. जेव्हा लोकांनी पाहिलं की येशू रडत आहे तेव्हा ते म्हणाले: ‘येशूचं लाजरवर खरंच खूप प्रेम होतं.’ पण, ‘येशूने त्याच्या मित्राला वाचवलं का नाही?’ असा विचार काही लोक करू लागले. मग येशूने काय केलं?

येशू कबरेजवळ गेला. कबरेला एका मोठ्या दगडाने बंद केलं होतं. त्याने अशी आज्ञा केली: ‘दगड बाजूला करा.’ मार्था म्हणाली: ‘पण, आता चार दिवस झाले आहेत! त्याच्या शरीराला वास येत असेल.’ तरीसुद्धा, त्यांनी तो दगड बाजूला केला. मग येशूने प्रार्थना केली: ‘बापा, तू माझं ऐकतोस यासाठी तुझे खूप आभार. तू नेहमीच माझं ऐकतो हे मला माहीत आहे, पण तू मला पाठवलं आहे हे या लोकांना समजावं म्हणून मी आज या लोकांसमोर तुझ्याशी बोलत आहे.’ मग त्याने मोठ्याने हाक मारली: “लाजर, बाहेर ये!” मग अगदी आश्‍चर्य करण्यासारखी गोष्ट घडली. लाजर कबरेतून बाहेर आला. त्याला कापडाच्या पट्ट्यांनी गुंडाळलेलं होतं. येशूने म्हटलं: “त्याला मोकळं करा आणि जाऊ द्या.”

तिथे असलेल्या बऱ्‍याच लोकांनी येशूवर विश्‍वास ठेवला. पण, काहींनी जाऊन ही गोष्ट परूश्‍यांना सांगितली. तेव्हापासून, लाजर आणि येशूला मारून टाकण्याची परूशी लोकांची इच्छा होती. १२ प्रेषितांपैकी एक असलेला यहूदा इस्कर्योत इतरांपासून लपून परूश्‍यांकडे गेला. त्याने त्यांना विचारलं: ‘जर मी तुम्हाला येशूला पकडायला मदत केली तर तुम्ही मला किती पैसे द्याल?’ ते त्याला चांदीची तीस नाणी द्यायला तयार झाले. तेव्हापासून यहूदा येशूला धरून देण्याची संधी शोधू लागला.

“देव आम्हाला संकटांतून मुक्‍त करणारा देव आहे; आणि मृत्यूपासून सोडवणारा प्रभू परमेश्‍वर आहे.” —स्तोत्र ६८:२०