व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ८७

येशूचा शेवटचा वल्हांडण सण

येशूचा शेवटचा वल्हांडण सण

यहुदी लोक दरवर्षी निसान महिन्याच्या १४ व्या दिवशी वल्हांडणाचा सण साजरा करायचे. यहोवाने त्यांना मिसरच्या गुलामीतून मुक्‍त करून वचन दिलेल्या देशात कसं आणलं, याची त्यांना यामुळे आठवण व्हायची. इसवी सन ३३ या वर्षी येशूने आपल्या प्रेषितांसोबत वल्हांडण सण साजरा केला. त्याने यरुशलेममध्ये माडीवरच्या एका खोलीत हा सण साजरा केला. जेवण संपत आलं तेव्हा येशूने म्हटलं: ‘तुमच्यापैकी एक जण मला धोका देणार आहे.’ हे ऐकून प्रेषितांना धक्काच बसला. ते येशूला विचारू लागले: ‘कोण आहे तो?’ येशूने त्यांना म्हटलं: ‘मी ज्याला भाकरी देईन, तोच आहे मला धोका देणारा.’ मग त्याने यहूदा इस्कर्योतला भाकरीचा एक तुकडा दिला. तेव्हा, यहूदा लगेच खोलीतून निघून गेला.

मग येशूने प्रार्थना केली आणि भाकरीचे तुकडे केले. त्याने ते तुकडे बाकीच्या प्रेषितांना दिले. त्याने त्यांना म्हटलं: ‘ही भाकरी खा. तुमच्यासाठी मी देणार असलेल्या माझ्या शरीराला ही भाकरी सूचित करते.’ मग त्याने द्राक्षरसावर प्रार्थना केली आणि त्याच्या प्रेषितांना तो दिला. तो त्यांना म्हणाला: ‘हा द्राक्षरस प्या. तुमच्या पापांच्या माफीसाठी मी जे रक्‍त वाहणार आहे त्याला हा सूचित करतो. मी तुम्हाला वचन देतो, की तुम्ही स्वर्गात माझ्यासोबत राजे म्हणून राज्य कराल. दरवर्षी माझ्या आठवणीत हे करत राहा.’ आजही संपूर्ण जगात येशूचे शिष्य दरवर्षी एकत्र येऊन, याच दिवशी हा सण साजरा करतात. या सणाला प्रभूचं सांजभोजन असं म्हटलं जातं.

जेवण झाल्यानंतर प्रेषितांमध्ये भांडण सुरू झालं. आपल्यापैकी सर्वात मोठा कोण या विषयावर त्यांच्यात वाद होत होता. पण, येशूने त्यांना म्हटलं: ‘तुमच्यामध्ये सर्वात मोठा तोच आहे, जो स्वतःला सर्वात लहान म्हणजे सर्वात कमी महत्त्वाचा समजतो.’

त्याने पुढे म्हटलं: ‘तुम्ही माझे मित्र आहात. तुम्हाला जे सांगावं असं माझ्या पित्याची इच्छा आहे, त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगतो. मी लवकरच स्वर्गात माझ्या पित्याकडे जाणार आहे. तुम्ही इथेच राहाल आणि एकमेकांवर असलेल्या तुमच्या प्रेमावरून तुम्ही माझे शिष्य आहात, हे लोक ओळखतील. जसं मी तुमच्यावर प्रेम केलं आहे, तसंच तुम्हीसुद्धा एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे.’

मग शेवटी येशूने यहोवाला प्रार्थना केली. त्याने विनंती केली, की यहोवाने त्याच्या शिष्यांना सांभाळावं आणि सोबत मिळून शांतीने काम करण्यासाठी मदत करावी. तसंच, यहोवाच्या नावाचा गौरव व्हावा अशीही त्याने विनंती केली. मग, येशू आणि त्याचे प्रेषित यहोवासाठी स्तुतिगीतं गाऊन बाहेर गेले. आता येशूला अटक करण्याची वेळ जवळ आली होती.

“लहान कळपा, भिऊ नको, कारण तुम्हाला राज्य देण्यास तुमच्या पित्याला आनंद वाटला.”—लूक १२:३२