व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ९१

येशूचं पुनरुत्थान

येशूचं पुनरुत्थान

येशूच्या मृत्यूनंतर, योसेफ नावाच्या एका श्रीमंत माणसाने पिलातची परवानगी घेऊन, येशूचं शरीर वधस्तंभावरून खाली उतरवलं. योसेफने येशूच्या शरीराला सुगंधी मसाले लावले आणि त्याला उत्तम प्रतीच्या मलमलीच्या कापडात गुंडाळलं. त्याने येशूच्या शरीराला एका नवीन कबरेत ठेवलं. मग त्याने कबरेला एका मोठ्या दगडाने झाकलं. मुख्य याजक पिलातला म्हणाले: ‘आम्हाला भीती आहे, की येशूचे काही शिष्य त्याचं शरीर चोरून नेतील आणि तो जिवंत झाला आहे असं म्हणतील.’ म्हणून पिलातने त्यांना म्हटलं: ‘कबरेचं दार पूर्णपणे बंद करा आणि तिथे पहारेकरी ठेवा.’

तीन दिवसांनंतर काही स्त्रिया पहाटेच कबरेकडे आल्या. कबरेच्या समोर असलेला मोठा दगड बाजूला सरकवलेला आहे हे त्यांनी पाहिलं. कबरेच्या आत एक देवदूत होता. त्याने स्त्रियांना म्हटलं: ‘घाबरू नका. येशूला जिवंत करण्यात आलं आहे. जा आणि त्याच्या शिष्यांना सांगा, की त्यांनी येशूला गालीलमध्ये जाऊन भेटावं.’

मग्दालीया मरीया ही घाईघाईने पेत्र आणि योहान यांना शोधायला गेली. त्यांना भेटल्यावर ती म्हणाली: ‘कोणीतरी येशूचं शरीर घेऊन गेलं.’ हे ऐकून पेत्र आणि योहान कबरेकडे पळाले. कबर रिकामी आहे हे पाहिल्यानंतर ते त्यांच्या घरी परत गेले.

जेव्हा मरीया कबरेकडे परत आली, तेव्हा तिने आत दोन देवदूतांना पाहिलं. ती त्यांना म्हणाली: ‘माझ्या प्रभूला ते कुठे घेऊन गेले माहीत नाही.’ मग तिने एका माणसाला पाहिलं. तिला वाटलं की तो माळी आहे. ती त्याला म्हणाली: ‘तुम्ही त्याला कुठे नेलं आहे, ते कृपा करून मला सांगा.’ पण जेव्हा त्या माणसाने तिला “मरीया” अशी हाक मारली, तेव्हा तिने लगेच ओळखलं की हा येशूच आहे. ती रडून म्हणाली: “गुरुजी!” मग असं म्हणून ती त्याला बिलगली. येशू तिला म्हणाला: ‘जा आणि माझ्या भावांना सांग, की तू मला पाहिलं आहेस.’ मरीयाने धावत जाऊन शिष्यांना सांगितलं, की तिने येशूला पाहिलं आहे.

त्याच दिवशी दोन शिष्य यरुशलेमहून अम्माऊस या ठिकाणी जात होते. ते रस्त्याने जात असताना त्यांच्यासोबत एक माणूस चालू लागला. ते कशाबद्दल बोलत आहेत, हे त्याने त्या शिष्यांना विचारलं. यावर शिष्य म्हणाले: ‘तीन दिवसांआधी मुख्य याजकांनी येशूला मारून टाकलं, हे तुला माहीत नाही का? आणि आता तर काही स्त्रिया म्हणत आहेत, की तो जिवंत आहे.’ त्या माणसाने विचारलं: ‘संदेष्ट्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर तुमचा विश्‍वास नाही का? संदेष्ट्यांनी म्हटलं होतं, की येशूचा मृत्यू होईल आणि नंतर त्याला उठवलं जाईल.’ मग तो त्या दोन शिष्यांना शास्त्रवचनांचा अर्थ समजावू लागला. संध्याकाळी अम्माऊस इथे पोचल्यावर शिष्यांनी त्या माणसाला जेवणासाठी थांबवलं. जेव्हा त्या माणसाने भाकर घेतली आणि देवाला प्रार्थना केली, तेव्हा त्यांना समजलं की हा येशूच आहे. मग येशू तिथून गायब झाला.

ते दोन शिष्य घाईघाईने यरुशलेमला गेले. प्रेषित ज्या घरात एकत्र जमले होते तिथे ते पोचले. जे काही घडलं ते सर्व त्यांनी प्रेषितांना सांगितलं. ते घरात असताना येशू सर्वांसमोर आला. तो येशू आहे यावर सुरुवातीला कोणाचाही विश्‍वास बसला नाही. मग येशूने त्यांना म्हटलं: ‘माझे हात बघा. मला स्पर्श करून पाहा. ख्रिस्ताला मेलेल्यांतून जिवंत केलं जाईल, असं आधीच लिहिण्यात आलं होतं.’

“मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय कोणीही पित्याकडे येऊ शकत नाही.” —योहान १४:६